Disclaimer     
            Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~

Thursday, 18 January 2018

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ भाग ०१

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~
मूळ लेखक नारायण धारप आणि डॉ. अरुण मांडे

भाग ०१ 

डॉक्टर जगदीश गंगाराम दाभाडे पारंपारिक वैद्यकीय व्यवसायातले डॉक्टर नव्हते. त्यांनी अॅन्थ्रोपॉलॉजीमधे पीएचडी केली होती. त्या विषयाचं त्यांना काही खास आकर्षण होतं म्हणून नाही, तर त्यांनी आयुष्याचा जो एक खास मार्ग निवडला होता त्याच्याशी सर्वात जवळचा तो विषय होता म्हणून. मानवी संस्कृतीच्या इतिहासात 'अस्पष्टिकृत', 'रहस्यमय', 'अविश्वसनीय' अशा अक्षरशः हजारो घटनांची नोंद झालेली आहे. तथाकथित 'रॅशनॅलिस्टां' नी या सर्व प्रकारांना कचऱ्याची टोपलीच दाखवली आहे. यासर्व प्रकारांना त्यांची लेबलं होती भ्रम, आत्मवंचना किंवा मेंदूचा काहीतरी विकार - ज्यांच्यामुळं बाह्यसृष्टीच्या आकलनात कालगणनेची उलटापालट होते, किंवा बाह्यसृष्टीत अस्तित्वात नसलेले घटक नजरेला वा स्पर्शाला वा कानांना त्या त्या पातळीवर जाणवू लागतात. एवढं स्पष्टीकरण त्यांच्यासाठी पुरेसं होतं. एका बंद दारामागे हे सर्व फिनॉमिनॉ लोटून देता येत होते आणि मग सोयीस्करपणे विसरून जाता येत होते.

या रॅशनिलिस्टांच्या रांगेत डॉक्टर दाभाडे किंवा जेजी - अगदी थोडेच निकटचे मित्र त्यांना या नावाने ओळखतात, बसत नव्हते. मानवी अनुभवांच्या या वेगळ्या श्रेणीचा अभ्यास हेच त्यांनी आपलं जीवितकार्य म्हणून स्वीकारलं होतं. या घटनांचा अभ्यास एवढीच त्यांची मर्यादा होती. त्यांची सत्यता कोणी पडताळून पाहिली होती का..? शक्य झालं तर त्या जागांना किंवा त्या अनुभवात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या होत्या का...? सत्य परिस्थिती काय होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता का..? मानववंशाच्या इतिहासात हाच एक महत्वाचा घटक होता. पुढे मागे त्या संशोधनानंतर या विषयावर एखादा लेख, यासाठी त्यांनी हा डॉक्टरेटचा प्रपंच केला होता.

जेजींच्या सुदैवाने त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. अर्थार्जनासाठी नोकरी - व्यवसाय - धंदा करण्याची गरजच नव्हती. नाहीतर त्यांना आपला नुसता अनुत्पादकच नाही, तर चांगलाच खर्चीक छंद जोपासताच आला नसता. खर्चीक, अर्थात...! कारण एका ठिकाणी बसून या प्रकारांचा अभ्यास कसा शक्य होता...? त्यासाठी अनेक ठिकाणांना भेटी द्याव्या लागल्या होत्या; अनेकांचे पत्ते धुंडाळून काढावे लागले होते. खूप पत्रव्यवहार करावा लागला होता आणि खेदाची गोष्ट ही होती की या प्रकरणात गुंतलेले लोक स्वतःला जास्तीत जास्त अनामिक ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. जेजींच्या वाचनात अनेक पाश्चिमात्य पुस्तकं आली होती. शिवाय असा एखादा थरारक प्रकार घडण्याची जरी वदंता उठली तरी मीडियाचे रिपोर्टर आपल्या कॅमेरासह तिथे हजर होत - आणि तिकडचा प्रत्येकजण या 'फिफ्टीन मिनिट्स ऑफ फेम' साठी अगदी उत्सुक असायचा.

पण जेजींनी स्वतःसाठी एक नियम घालून आखून घेतला होता. ऐकीव माहिती काहीही असो, स्वतः प्रत्यक्ष भेट दिल्याखेरीज, ती जागा, त्या व्यक्ती, खरोखरच अस्तित्वात आहेत याची खात्री पटल्याखेरीज ते काहीही स्वीकारत नसत. चक्षुवैंसत्यम्...!

सरदार रावते यांच्या वाड्याची हकीकत जेजींच्या कानावर येणं हे अपरिहार्य होतं. पुण्यापासून पस्तीस मैलावर माहूलगाव आहे. सुमारे चारपाच हजाराचं छोटंसं शहर, तशी काही मोठी प्रसिद्ध व्यापारीपेठ किंवा अडतीचं गाव नाही. भारतात अशी हजारांनी गावं आहेत. मुख्यतः व्यवसाय शेती आणि त्याच्या जोडीला इतर काही पूरक व्यवसाय. छोटी वर्कशॉप. लहान लहान कारखाने, पंचायत, सहकारी सोसायटी. तसं भरभराटीचं नाही, पण आपलं अस्तित्वं टिकवून ठेवलेलं. माहूलगावाचं विशेष म्हणजे रावते सरदारांचा वाडा. पेशवाईच्या अखेरच्या दिवसात बांधलेला. दीडदोन एकरांची जागा. एकेकाळी चारी बाजूंनी भक्कम तट होता, पण आता दगड निखळले होते. चारी कोपऱ्यांवरचे बुरुज ढासळले होते. तण गवत माजलं होतं. दगडी भिंतीत चांगला बारा बाय दहाचा, तीन इंची जाडीचा सागवानी दरवाजा होता. दरवाजा रेटायलासुद्धा दमाचा गडी लागायचा. आतल्या बाजूस एक मधे, एक खाली - शिवाय चांगली दहा शेर वजनाची जाड साखळी होती - ती अडकवली की बस. आत चारी बाजूंनी मोठं घडीव दगडाचं अंगण होतं. आणि मग समोर तीन मजली वाडा होता. आठ आठ पॅनलची दारं - आत दोन्ही बाजूला देवड्या. दरवाजाच्या वर नौबतखाना होता. दिवाळी गणपतीला दसऱ्या - पाडव्याला तिथे नगारेवाले, तुतारीवाले बसून गावाला ललकार देत. देवड्यांच्या बोळातून बाहेर आलं की चारी बाजूंना वर चढत गेलेली टोलेजंग इमारत दिसते. तीनही मजल्यांना आतल्या चौकात पहाणारे नक्षीकामाच्या खांबाचे आणि कमी महिरपींचे सज्जे होते. पूर्वी सर्व लाकूडकामाला सफेद पांढरा रंग दिलेला असायचा. तो रंग केव्हाच झडला होता. पण चिरेबंद भिंती आणि भक्कम लाकूडकाम. वाड्याची जराशी पडझड झाली तरी ती वरवरची होती, वाडा काही मोडकळीला आला नव्हता. आता या खोल्यांच्या लांबच लांब रांगा ओसाड पडल्या होत्या. पण एकेकाळी इथं सगेसोयरे, मित्र, परिचित, राजकीय हितसंबंधी, आश्रित यांची भीड लागलेली असेल. एवढ्यांच्या दिमतीला नोकरचाकरच शेपन्नास असतील. पण आता तो काळ गेला होता. वर्दळीची धूळ विरली होती. वाडा ओसाड आणि निर्जन होता.

पण माहूल गावात मात्र सरदारांच्या वाड्यासंबंधात एक जबरदस्त दहशत होती. हे अशक्य नाही की जवळ जवळ शंभर वर्षे ओसाड राहिलेल्या वाड्याला कोणा चोर डाकूने गुप्तधनाच्या आशेने रात्रीची चोरटी भेट दिली असेल. तसा आतमधे प्रवेश कठीण नव्हता. आणि त्याला काहीतरी भयानक - कदाचित काल्पनिकही - अनुभव आला असेल, आणि पाचाचे पाहतापाहता पंचवीस झाले असतील. दगडी भिंतीच्या दरजेत एखादं पिंपळाचं बी रुजलं की आधी त्याचं लहान रोपटं होतं, पण काही वर्षातच दगडी भिंत तोडण्याइतकी त्याच्या मुळांत शक्ती येते. सरदारांच्या वाड्याबद्दलची अफवाही अशीच गावकरांच्या काळजाच्या मुळाशी रुतून बसली होती. वास्तविक कोणत्याही घटनेला साधा कार्यकारणभावाचा निकष लावायला हवा होता. रावते सरदारांच्या वाड्यावरच्या वास्तवामधे काही घातपाती घटना घडल्या होत्या का...? काही दगाबाजी झाली होती का...? एखादा हात रक्ताने माखला होता का...? पण अर्थात यापैकी कोणत्याही प्रश्नाची उत्तरं सध्याच्या पिढीला माहीत नव्हती. कधीकाळी कोणास माहीत असलीच तर ते केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले होते. पण हा भीतीचा वारसा मात्र जसाच्या तसा शाबूत होता. प्रत्येक माणूस प्रत्येक माणसांचा समूह-त्यात गावकरी आलेच आपली काहीतरी विशिष्टता, काहीतरी खास ओळख जपण्याची खटपट करीत असतो. मग माहूलगावकरांनी सरदारांचा पछाडलेला वाडा ही आपली - गावाची - निशाणी म्हणून ठेवली तर त्यात काय नवल...? आणि मग अशा जागांचा सतत शोध घेणारे जेजी. त्यांच्या कानावर रावतेसरदारांच्या वाड्याची हकीकत येणं ही अगदी अपरिहार्य आणि नैसर्गिक घटना होती.

स्वतःच्या आवडीच्या विषयावर माणूस सततच विचार करीत असतो. मग जेजी याला अपवाद कसे असतील...? त्यांच्या मनातील खरी इच्छा ही होती, की हे सगळे पृथक पृथक घटक जर एकत्र आणता आले तर नक्कीच काहीतरी नोंद करण्यासारखी, नोटेबल अशी घटना घडेल.

जेजींच्या जवळची कात्रणांची आणि नांदीची जंत्री खूप लांबलचक होती. घरावर दगड पडण्याच्या - तथाकथित भानामतीच्या - घटना होत्या. पूर्वजन्मीच्या आठवणी सांगणाऱ्यांच्या हकिकती होत्या. घरातील वस्तूंची फेकाफेकी, मोडतोड, अन्नाची नासधूस, तथाकथित पोस्टरगीस्टच्या - कपड्यांवर डाग येणे अशा सारख्या घटना होत्या. अपघातात, वा अत्याचारात मरण पावलेल्या नातेवाईकांच्या प्रतिमा कधी मूक, तर कधी बोलक्या - दिसल्याचा नोंदी होत्या. त्याखेरीज आणखीही काही काही वर्गीकरण करता न येण्यासारख्या घटना होत्या.

जेजींनी स्वतःसाठी एक उपपत्ती बनवली होती. उदाहरणार्थ, एराल्डाइटसारख्या नोंदीत दोन भिन्न पदार्थ एकत्र मिसळले म्हणजेच त्यांच्यात आवश्यक तो चिकटपणा येतो. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन वायू एकत्र आले म्हणजेच ते मिश्रण स्फोटक बनतं. थोडक्यात या वर्णन केल्या गेलेल्या वेगवेगळ्या घटनांमागचे सर्व घटक ज्ञात झाले नव्हते. केवळ माणसातच अंगभूत असे काही विशिष्ट अपवादात्मक - गुणधर्म असून उपयोग नव्हता. आणखी कशाची तरी आवश्यकता होती. मग ते स्थळ असेल, एखाद्या खास व्यक्तीची हजेरी आवश्यक असेल, जो स्वतः घटनेमधे भाग घेत नाही, पण घटनांना गती मात्र देतो. किंवा पाण्यासारख्या एका विद्रावकाची आवश्यकता असेल - दोन पदार्थ पाण्यात विरघळवले की त्यांच्यात परस्पर प्रतिक्रिया होते, कोरड्या अवस्थेत होत नाही. जेजींच्या मते अशी विशिष्ट गुणधर्माची माणसं काही एका खास जागी एकत्र आणता आली तर नक्कीच काहीतरी विलक्षण घडेल, निदान तसं घडण्याची आशा तरी करता येईल.

तेव्हा नवल नाही, आपल्या उपपत्तीच्या दृष्टीने, सरदार रावत्यांचा वाडा हे जेजींना एक अतिशय आकर्षक जागा वाटली तर. साधी उपमा द्यायची झाली तर सुपीक जमीन तयार होती. योग्य ते बी तिथं पडायला हवं होतं.

जेजींचं सध्याचं वय चव्वेचाळीस वर्षाचं होतं. अठ्ठाविसाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. पण सुखी वैवाहिक आयुष्य त्यांच्या नशिबात नव्हतं. विवाहानंतर दोन वर्षातच पत्नीच्या कुरबुरी सुरू झाल्या. जेजींनी स्वतः शेवटपर्यंत संयम पाळला. तोंडून अधिकउणा एकही शब्द जाऊ दिला नाही. कदाचित त्यांना भडकवण्याचीही पत्नीची खटपट असेल. कोणाच्यातरी सल्ल्यावरून केलेली. पोटगीसाठी शेवटी जेजी बधत नाहीत याची खात्री झाल्यावर पत्नी घर सोडून निघून गेली. जेजींनी तिला का विचारले नाही. जा किंवा थांब काहीही सांगितलं नाही. मात्र मनाशी खूणगाठ बांधली, वैवाहिक जीवन आपल्यासाठी नाही. तेव्हा गेली बारा तेरा वर्ष ते एकट्यानेच आपल्या ब्लॉक मधे रहात होते. स्वैपाकीण आणि घरकामाची बाई दोघीही वक्तशीर, कामसू आणि प्रामाणिक होत्या. आजच्या दिवसांत यापेक्षा जास्त अपेक्षा कशाची करायची...?

जेजींना त्यांच्या संशोधनासाठी, वाचनासाठी, फिरतीसाठी दिवसाचे चोवीस तास उपलब्ध होते. आणि तीच त्यांची खरी आवड. तेव्हा आपल्या जीवनात काही कमी किंवा एखादी उणीव आहे असं त्यांना कधी चुकूनही वाटलं नाही.

जेजींकडे पाहणाऱ्याला एक बरीच उंच, किंचित कृश, गौरवर्णी चेहऱ्याची, घाऱ्या तीक्ष्ण डोळ्यांची, सतत लहानसहान हालचाली करणाऱ्या हातांची, नीटनेटक्या वेशातील आकृती दिसली असती. केस जरासे मागे गेले होते. एखादा दिवस दाढी राहिली तर हनुवटीवर निळसर छाया दिसायची. त्यांचा आवाज किंचित घोगरा खर्जातला होता. पण एकूण व्यक्तिमत्व समोरच्या व्यक्तीवर छाप टाकण्यासारखं होतं.

माहूलगावात जायला सकाळी सातपासून हव्या तेवढ्या एसटी होत्या. जेजींनी नऊची एसटी घेतली. त्यांनी बरोबर एक झिपकेस घेतली होती. केसमधे एक हवेची उशी, एक पातळसर शाल, टॉवेल, पायजमा, दाढीचं सामान, गार पाण्याचा थरमास, प्लॅस्टिकच्या पिशवीत चार पोळ्या, दुसऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाट्याची भाजी आणि चटणी मिठाच्या पुड्या असं सामान होतं. एखादा दिवस तिथेच मुक्काम करायचा त्यांचा विचार होता.

एसटी सव्वादहा वाजता झाडाखाली थांबली. उतरणारे जेजी एकटेच होते. पन्नास पावलांवरच गावाची बाजारपेठ होती. ठराविक साच्याची एक मजली दुकानं. एका बऱ्यापैकी हॉटेलात जेजी शिरले. टेबलापाशी बसल्या-बसल्या त्यांनी एक कप चहाची ऑर्डर दिली. चहा काही मोठा चविष्ट नव्हता, पण अगदीच काही टाकाऊही नव्हता. पैसे देण्यासाठी ते गल्ल्यापाशी आले. गल्ल्यामागे बहुदा मालकच असावेत. गंजीफ्रॉकमधला कळकट रंगाचा आडव्या शरीराचा माणूस. काउंटरवर नोट ठेवता ठेवता जेजी म्हणाले,

"मालक, तुम्हाला जरा आता वेळ आहे का...? काही विचारायचं होतं -"

"विचारा की, त्यात वेळ कशासाठी काढायला हवा...?"

"नाही, म्हणजे काय आहे, विचारतो ते एखाद्याला आवडेल, एखाद्याला आवडणार नाही."

"विचारा तर खरं, मग पाहू या..."

"सरदार रावत्यांच्या वाड्याबद्दल विचारायचं होतं..."

मालक जेजींकडे नुसते पाहतच राहिले. आणि मग म्हणाले,

"सरदारांच्या वाड्याबद्दल काय...?"

"आता कानावर आलं ते सांगतो. अशी अफवा आहे की वाडा पार पछाडलेला आहे. त्यातलं खरंखोटं काय ते विचारायचं होतं."

"पण साहेब यात तुमचा संबंध कोठे येतो...?"

"सांगतो ना. या झपाटलेल्या, पछाडलेल्या अशा जागांचा मी अभ्यास करीत असतो. म्हणजे तिथे कोणाला काय अनुभव आला, त्या जागेचा इतिहास काय आहे अशा झपाटण्याला काही कारण आहे का - याचा शोध घेत असतो."

"पण कशासाठी..? अशा अभ्यासात काय कमाई असणार...?"

"मालक जिथेतिथे पैशाचा, फायदा तोट्याचा विचार करायचा नसतो. माणूस काही काही गोष्टी हौसेपायी, छंदापायी करीत असतो."

"म्हणजे स्वतःच्या पदराला खार लावून...?"

"हो ते तर आलंच. पण हा ज्याचा त्याचा स्वभाव असतो. मी तुम्हाला अगदी खरी तीच गोष्ट सांगितली आहे. तुम्ही गावचे, शिवाय व्यवसायाने रोज तुमच्याकडे शेकडो लोकांशी संबंध येत असणार - म्हणून तुमच्यापाशी चौकशी केली."

"ते बरोबर आहे म्हणा," स्वतःशीच जरा वेळ विचार करीत ते गप्प बसले. आणि मग म्हणाले, "त्याचं काय आहे साहेब, या गोष्टी सहज ऐशी नव्वद शंभर वर्षांपूर्वीच्या आहेत. तेव्हा आता कोणी साक्षीदार हयातच नाही. तेव्हा कानावर येतं ते काही सगळंच खरं नसणार. कोणी त्याला पदरचं तिखटमीठ लावणार, कोणी त्यात स्वतःची भर घालणार...."

तेवढ्यावर त्यांचं बोलणं थांबलं. हॉटेलात गर्दीही बरीच झाली. काउंटरपाशीही गर्दी वाढायला लागली. मधेच जरा उसंत मिळताच जेजींनी विचारलं,

"निदान कोणाचं तरी नाव सुचवा की - त्याला विचारीन..."

"हां हे बरीक ठीक आहे. तुम्ही असं करा - पंचायतीच्या ऑफिससमोरच गणपत मिस्त्रीचं वर्कशॉप आहे. त्याला विचारा आणि सांगा मामानी पाठवलं आहे...."

"ठीक आहे..." म्हणत जेजी बाहेर पडले.

पंचायतीची इमारत ओळखायला अर्थात सोपी. गणपत मिस्त्रीचं वर्कशॉप म्हणजे पत्र्याची एक शेड. तशी अरुंद पण आत बरीच पसरत गेलेली. जेजी दारापाशीच काहीवेळ उभे राहिले. ठोकाठोकीचा काहीतरी आवाज येत होता. काही वेळाने साधारण पंचेचाळीसचा, अंगावर तेलकट गंजीफ्रॉक, खाकी पँट अशा कपड्यांच्या, चेहऱ्यावर साधारण दोनतीन दिवसांची करड्या पांढुरक्या रंगाची दाढीची वाढ असलेला इसम त्यांच्यापाशी येऊन उभा राहिला.

"गणपत मिस्त्री...?"

"हो, काय काम होतं...?"

"काम असं नाही. पण मामा हॉटेलवाल्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे. तुम्हाला जरासा वेळ आहे का...?"

"बोला..."

"इथं सरदार रावत्यांचा वाडा आहे ना...?"

"हो.." गणपत जरा सावधपणे उभा राहिला.

"त्या संबंधात काही माहिती मिळते का ते पहात होतो. मामांना विचारलं तर त्यांनी तुमचं नाव सांगितलं - म्हणून तुमच्याकडे आलो..."

"वाड्याची माहिती तुम्हाला कशाला हवी...? मालकांनी पाठवलं का...?"

"सरदार रावत्यांनी...! छे..! माझी त्यांची तर गाठभेटही झालेली नाही..."

"मग वाड्याशी तुमचं काय काम असणार...? काही समजत नाही..."

"तुम्ही म्हणता ते बरोबर आहे... पण जरा वेळ काढलात तर मी तुम्हाला सर्व काही अगदी खुलासेवार समजावून सांगू शकेन..."

"साहेब आता हातात अर्जंट काम घेतलंय... तास दोनतास तरी सवड व्हायची नाही... दोनच्या सुमारास आलात तर..."

"येईन की आणि एक तुम्ही गावचेच म्हणून विचारतो. गावात राहण्याची लॉजसारखी काही सोय होईल का...?"

"रात्रीच्या मुक्कामाला...? पुढच्या चौकात छत्रपती खानावळ आहे ना, तिथं चौकशी करा. वर दोनतीन खोल्या आहेत त्याच्याकडे."

"ठीक आहे... मी दोनला येतो..."

क्रमशः

तळटीप: - ग्रुपवरील अ‍ॅडमीनच्या पूर्वपरवानगी शिवाय ही कथा इतर कुठेही पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे.

प्रस्तावना                                                      भाग २

0 comments:

Post a Comment