Disclaimer     
            Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~

Saturday, 20 January 2018

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ भाग ०२


~ रावतेंचा पछाडलेला वाडा
मूळ लेखक - नारायण धारप आणि डॉ. अरुण मांडे

भाग ०२

चौकातली छत्रपती खानावळ - आत जेवणाऱ्यांची गर्दी बरीच होती. जेजी सरळ आत गेले. गल्ल्यावरच्या माणसाला विचारलं, "मालक आहेत का...?" त्याने एका हाताने आतली खूण केली. जेजी आत गेले. एका जुन्या टेबलामागे एक वयस्क माणूस काहीतरी कागद वाचत बसला होता. जेजींना पाहताच तो जरा सावरून बसला, "नमस्कार..." जेजी म्हणाले. "आपण खानावळीचे मालक...?"

"........"

"तुमच्याकडे खोल्या आहेत म्हणून समजलं. मला एखादी मिळेल का...?"

"तुम्हाला साहेब...? इथं खोली हवी...?"

"निदान एका रात्रीसाठी तरी - भाड्याचा प्रश्न नाही..."

"साहेब तसं नाही. तुम्ही जंटलमन पडला. सांगायचं तरी कसं...?"

"एवढी काय अडचण आहे...?"

"साहेब..." पुढे वाकून हलक्या आवाजात म्हणाला. "वरच्या खोल्या कोण वापरतं माहीत आहे का..?" एक डोळा मिचकावून डाव्या हातानी तर्जनी नाकावर आपटत तो म्हणाला, "साहेब वर धंदा चालतो - रात्रभर चाललेला असतो. आता सांगा तुमच्यासारख्याला तिथं राहवेल का...?"

जेजींना याची अजिबात कल्पना नव्हती.

"म्हणजे समजा इथं एखादी रात्र काढायची वेळ आली तर कुठेच सोय होण्यासारखी नाही म्हणा की...!"

"तुम्ही म्हणता ते खरं आहे साहेब - त्याचं काय आहे - गावाला कधीकधी ते फौजदार मामलेदार, झेडपीचे कोणी अधिकारी असे भेट देतात ना तेव्हा ते सगळे पाटलाच्या घरी उतरतात...."

म्हणजे हा आता आपल्याला त्या पाटलाच्या वाड्याचा पत्ता देणार. जेजींनी आता या कोण म्हणतं टक्का दिलाच्या खेळाचा कंटाळा आला होता. हॉटेलवाल्यानं गणपत मिस्त्रीकडे, त्याने खाणावळल्याकडे पाठवलं - आता हा आपल्याला त्या पाटलाचा पत्ता सांगणार - मालकाला मधेच थांबवत जेजी म्हणाले, "हे पहा - दुपारी दोनला मला एकाची भेट घ्यायची आहे. ती झाली की मग गावात मुक्काम करायची वेळच यायची नाही. माझी एक विनंती आहे, दुपारी दोन वाजेपर्यंतचे दोन तास मला वरची खोली वापरायला देता का...? तसा पैशाचा प्रश्न -"

"साहेब, काय आम्हाला लाज आणता...! अहो, खुशाल वापरा - "

"वा..! छान...! आभारी आहे...!" म्हणत जेजींनी झिपबॅग उचलली. तिथेच कोपऱ्यात मोठ्या टिनच्या ड्रमला खाली नळ लावला होता. त्या नळाखाली हात तोंड धुतलं. आणि वरची वाट धरली. खिडक्या पूर्वेला होत्या आणि आता खोलीत छान गारवा आला होता. खोलीत एक लोखंडी पट्टीची खाट होती वर गादी. चार उशा दोन चादरी. भिंतीपाशी आरशाचा ड्रेसर आणि एक दोन खुर्च्या.

कॉटवर बसून जेजींनी बॅग उघडली. खाद्यपदार्थांच्या पिशव्या बाहेर काढल्या. दोन पोळ्या, भाजी, चटणी असं व्यवस्थित खाऊन घेतलं. वर थंडगार पाणी प्यायल्यावर सर्व वस्तू बॅगमधे परत भरून ते कॉटवर आडवे झाले. सकाळपासूनच्या पायपीटने जरा थकवा आलाच होता. पाहता पाहता त्यांचा डोळा लागला. जाग आली तेव्हा पावणेदोन वाजले होते. आरशात पाहून केस सारखे करीत त्यांनी बॅग उचलली. खालचा रस्ता धरला. मालक आता काउंटरपाशी हिशोब करीत बसले होते. जेजींना पाहताच ते जरा हसून म्हणाले....

"काय मिळाला का आराम...?"

"अगदी छान. पुन्हा एकदा आभार." जेजींनी हातातली वीसची नोट काउंटरवर ठेवली. एकदम मागे सरत मालक म्हणाले,

"अहो, साहेब..! हे काय..?"

"अगदी योग्यच आहे." जेजी हसत म्हणाले, "राहू द्या हो, आठवण..."

एक हात वर करून त्यांचा निरोप घेऊन जेजी बाहेर पडले.

~~~~~~~~~

वर्कशॉपबाहेर गणपत मिस्त्री त्यांची वाट पाहात होता.

"काय उरकलं काम...? झालात मोकळे...?" जेजींनी हसत विचारले.

"हो तुमचीच वाट पहात होतो साहेब."

"अहो मिस्त्री, एक सांगा, हा वाडा गावात आहे तरी कुठं...?"

"गावात नाही साहेब, गावाबाहेर अडीच तीन मैलांवर आहे," जेजींचा चेहरा पाहून मिस्त्री हसत म्हणाला, "साहेब आपली मोटारसायकल आहे ना - चलता...? पंधरा मिनिटात वाड्यावर पोहोचूया -"

"पण नुसतं बाहेरून पाहून काय फायदा होणार आहे...?"

"बाहेरून कशासाठी...? चांगला आतून दाखवतो की..."

"आतून...? पण -"

"त्याचं काय आहे साहेब. सरदार स्वतः महिन्या दीड महिन्याकाठी इथं येतातच, मग बरोबर मी आणि गावातला एखादा बिगारी घेऊन वाड्यावर येतात - खालपासून वरपर्यंत नीट पाहणी करतात - काही बारीकसारीक काम निघाले तर मला ते करायला सांगतात - आणि बिगाऱ्याकडून एकदोन दिवसात वाड्याची साफसफाई करून घेतात -"

"पण सरदारांचा मुक्काम कुठं असतो...?"

"ते कसले गावात राहायला हो..! आले की चार तासात पाहून घेतात की लगोलग परत. पण माझ्यापाशी किल्ल्या ठेवून जातात - जे काय एक दोन दिवस लागतील तेवढ्यापुरता मी वाड्यावर असतो -"

जेजी काहीच बोलले नाहीत. निदान एक तरी, आणि सगळ्यात महत्वाचं काम आज होणार असं दिसत होतं. प्रत्यक्ष त्या वाड्यावर भेट..!

गणपतने किक मारून गाडी सुरू केल्यावर जेजी मागे बसले. गाडी खडीच्या रस्त्यावरून धूळ उडवीत निघाली आणि खरोखरच दहा मिनिटांत वाड्याच्या चिरेबंद तटापाशी पोचली. गाडीवरून उतरल्यावर जेजी समोरच्या त्या प्रचंड दरवाजाकडे नवलाने पाहात होते. मनावर छाप पाडणारं आणि एक प्रकारचा दबाव आणणारं दृष्य त्यांना वाटलं.

गणपतने, गाडी स्टँडवर लावली, इंजिनची किल्ली काढून घेतली. आणि मग खिशातून मोठा किल्ल्यांचा एक जुडगा काढला. त्यापैकी एक निवडून त्याने दरवाजातल्या दिंडीच्या कुलुपाला लावली. गणपत आणि त्याच्या मागोमाग जेजी दिंडीतून वाकून आत शिरले.

समोर फरसबंद अंगण आणि त्याच्यापुढे तीन मजली इमारत. मागून गणपतची हाक आली - "साहेब हे पहा -"

जेजींनी मागे वळून पाहिलं - गणपत बंद दाराकडे बोट दाखवीत होता. तो काय दाखवत होता हे पाचसात सेकंदांनी जेजींच्या लक्षात आले. तुळईसारखे जाड-जाड तीन अडसर आणि मधल्या कोयंड्यात कधी पाहिली नव्हती अशी जाडजूड कडी. बचावासाठी केवढी तयारी..! मग त्यांना उमगलं - एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीचा कालच असा धामधुमीचा, असुरक्षिततेचा होता. जेव्हा हा वाडा बांधला गेला होता किंवा कदाचित त्याआधीही पंचवीसतीस वर्षं, तेव्हा सुरक्षिततेसाठी हे आवश्यकच होते...

गणपत पुढे निघाला आणि वाड्याच्या मुख्य दारातली दिंडीही त्याने जवळच्या किल्लीने कुलूप उघडून आत ढकलली. जेजी त्याच्यामागोमाग आत गेले. आत एक बोळ. दोन्ही बाजूंना देवड्या आणि वरच्या मजल्याकडे जाणारे जिने, समोर मोठा फरसबंद चौक. गणपत मागोमाग ते चौकात आले. चारही बाजूंनी तीन मजली इमारत. सर्व खोल्यांची दारं तिथे उघडत होती, ती सर्व दारं आत्ता बंद होती.

जेजी गणपतकडे वळून म्हणाले, "मिस्त्री तुमच्या जेवणाचं काय..?"

"आता तुमचं काम झालं की मग जेवण साहेब.."

"मिस्त्री, खरं सांगू की, मी बरोबर पोळीभाजी आणली होती, त्यातली काही शिल्लक आहे. पाणीही आहे. तुम्हाला चालत असेल तर..."

"साहेब न चालायला काय झालं...? अन्नाला कुणी नाही म्हणतं का..?"

"मग या बसा.." देवडीवर बॅग ठेवून जेजीनी बॅग उघडली. आतल्या पोळ्या, भाजी, चटणी गणपतसमोर ठेवली, शेजारी थरमॉस ठेवला. "तुमचं खाणं होऊ द्या. तोवर मी वाड्याला एक चक्कर टाकून येतो - मग आपण सावकाश बोलूया काय...?"

"या ना, सावकाश पाहून या. पण साहेब, खोल्या पाहून झाल्यावर दारं बंद करायला विसरू नका - नाहीतर पाखरं बिखरं काहीतरी आत जायचं.."

"हो अगदी नीट ठेवीन..." जेजी म्हणाले.

~~~~~~~~~

डाव्या जिन्याने ते वर आले. डावीकडे एकेक खोली पाहात निघाले. कोणत्याही दाराचा आवाज होत नव्हता. बिजागरांना व्यवस्थित तेलपाणी केलेलं असावं. आत कोठे घडवंच्या, कोठे चौकोनी बैठी आसनं असं सामान होतं. भिंतींना कपाटं होती - पण ती सर्व रिकामी होती. थोडी बहुत धूळ सगळीकडेच होती. पण भिंतींचा आणि दारंखिडक्यांचा झडलेला रंग एवढी गोष्ट सोडली तर इमारत उत्तम अवस्थेत होती. दुसरा मजला पाहून झाल्यावर ते उजव्या बाजूने वर तिसऱ्या मजल्यावर आले आणि एक एक खोली पाहात पुढे निघाले.

ते त्या खोलीच्या दारासमोर आले मात्र -

एकदम भोवंड यावी तसं वाटलं. पायाखाली एकदम खोल काळी गर्ता उघडावी, असं वाटलं. उजव्या खोलीच्या बाजूने एखाद्या पाण्याचा प्रचंड लोट अंगावर येत आहे अशी भावना झाली. किंवा एखाद्या खोल खोल धबधब्याच्या काठावरून आपण खाली खोल पडतो आहोत अशी भावना झाली -

विजेचा झटका बसल्यासारखे ते एकदम दोन पावलं मागे सरले.

त्यांना हा अनुभव सर्वस्वी नवा होता. जेजींनी आतापर्यंत कितीतरी स्थळांना भेटी दिल्या होत्या, ज्या स्थळांबद्दल पछाडल्या गेल्याच्या, झपाटल्या गेल्याच्या अफवा होत्या. पण त्यांना स्वतःला आजवर कधीही काहीही जाणवलं नव्हतं. कदाचित आपल्यामधे ही प्रतियोगिता, ही सेन्सेटिव्हिटी नसावी असा त्यांचा समज झाला होता. पण तो समज किती खोटा होता.

पाचसात क्षणापुर्वी मनाच्या पायालाच जो एक जबरदस्त हादरा बसला होता तो थरकाप उडवणारा होता. मनातल्या गर्तेच्या किंवा पाणलोटाच्या किंवा धबधब्याच्या उपमा ही मनाची एक स्वाभाविक खटपट होती. स्पष्टीकरणे होऊ न शकणाऱ्या, ज्यांचा कधीही पूर्वानुभव नाही अशा घटनांना अनुभवातलं, आवाक्यातलं एखादं रूप देण्याचा हा प्रयत्न होता. शेवटी मनातल्या विचारांनासुद्धा एक मळलेला मार्ग लागतोच. मन स्वतः काहीही नवनिर्मित करीत नाही.

पण आता जेजींना या मर्यादा ओलांडाव्या लागणार होत्या. अभ्यास आता अकॅडेमिक पातळीवर राहिला नव्हता - तो एकदम वैयक्तिक पातळीवर आला होता - अनुभव आता त्यांना स्वतःच येऊन भिडला होता - त्याबरोरच हेही आलं की पूर्वीची वस्तुनिष्ठता टिकणे आता कठीण होणार होतं.

ते उजव्या हाताच्या बंद दाराकडे पाहात होते - जिथून काही क्षणापुर्वीच्या विलक्षण अनुभवाची लाट त्यांच्यावर आदळली होती - आता त्यांनी काय करायला हवं..?

तो अनुभव पुन्हा एकदा घ्यायचा..? पण त्या उद्रेकी कल्लोळापुढे त्याचं मन टिकाव धरू शकलं नाही तर..? त्याचा चुराडा चोळामोळा झाला तर..? पण त्यांना आपल्या प्रतिक्रियेचं नवल वाटत नव्हतं, कारण ती अगदी प्रतिनिधिक होती. एकदा चटका बसल्यानंतर सर्वसामान्य मनासासारखे मागे सरणार होते...? त्यांचा अभ्यासकाचा आव काय नाटकी होता..?

आपल्याही कसोटीचा हा क्षण आहे, त्यांना वाटलं.

आणि त्यांनी आपला निर्णय घेतला.

एक एक पाऊल पुढे टाकत ते चालायला लागले - खोलीच्या दारापासूनचं अंतर कमीकमी होत चाललं तसं त्या आघाताच्या अपेक्षेने आपण आपलं शरीर आवळून घेतलं आहे हे त्यांच्या ध्यानात आलं -

आणि ते दारासमोर आले...

एक साधा सज्जा आणि साधं दार...

त्यांना काहीही जाणवलं नव्हतं...

आता आणखी एक प्रश्न - खोलीचं दार उघडून आत पाहायचं का...?

धाडस आणि साहस यांच्यातील सीमारेषा खूपच धूसर असते. पण जेजींना जाणवलं - हा काही त्यांचा एकट्याचा वैयक्तिक असा प्रश्न नव्हता. त्यांच्या मनात एक कल्पना आली होती. पंचेंद्रियांच्या पलीकडच्या काही संवेदनांना प्रतियोगी असणारी माणसं, त्यांना, या वेगवेगळ्या शक्तीच्या संयोगाने काही विलक्षण घटना घडू शकतील का हे त्यांना पाहायचं होतं. पण त्यांच्या आमंत्रणाने येणाऱ्या या व्यक्ती - ते स्वतःच त्यांचे मार्गदर्शक, नेता सल्लागार, असणार नव्हते का...? मग त्यांना पुढच्या वाटेत - काही धोके असेलच तर माहीत असायलाच हवे होते. जी गोष्ट करण्याची त्यांची स्वतःची हिंमत होत नव्हती, किंवा तयारी नव्हती अशा गोष्टी ते आपल्या सहकाऱ्यांना करायला ते कसे सांगू शकतील. त्यांनी आपला निर्णय क्षणभरातच घेतला.

समोरच्या दाराची कडी काढून दार अलगद आत ढकललं. अर्थात अपेक्षेने शरीर आखडून घेतलं गेलं होतंच पण त्यांना दिसलं की समोर एक साधी खोली होती. बाहेर उघडणाऱ्या समोरच्या भिंतीतल्या दोन्ही खिडक्या बंद होत्या - पण खोलीत अक्षरशः काहीही नव्हतं.

त्यांनी दार लावून घेतलं. आणि बाहेरून कडी घातली.

मघाचा अनुभव हा काही भ्रम भासाचा परिणाम नव्हता. काही क्षण तरी ह्या खोलीच्या आसपास 'कशाचा' तरी वावर होता. काहीतरी अमानवी प्रचंड शक्तीचा उत्सर्ग करणारं, त्यात सापडलेल्या मनाचा पार चोळामोळा करणारं, आता त्याचा मागमूसही नव्हता.

दोन स्पष्टीकरणं असू शकत होती.

एक तर ते स्थिर अचल असं नसेल आणि त्याचा वावर या सर्वच्या सर्व वास्तूमध्ये सर्वत्र होत असेल - म्हणजे सर्वत्र सावधानता बाळगायला हवी..!

किंवा दुसरं - त्यांचं त्या खोलीसमोरचं आगमन त्याला सर्वस्वी अनपेक्षित असेल आणि त्या काही क्षणात त्यांना त्याचं अस्तित्व जाणवलं होतं - मग लगोलग त्याने स्वतःला मागे - एखाद्या वेगळ्या मितीत - खेचलं असेल, किंवा स्वतःला अदृश्य अस्पर्श जाणिवेपलीकडचं असं एखादं रूप दिलं असेल.

स्वतःशीच विचार करीत पुढची एकएक खोली जरा सावधपणाने उघडून पाहात आणि मग आपल्या मागे बंद करीत त्यांनी तिसऱ्या मजल्यावरची पहाणी पूर्ण केली आणि दोन जिने उतरून ते खालच्या देवडीत येऊन पोहोचले.

खाणपिणं उरकून, एक विडी पेटवून गणपत भिंतीला टेकून आरामात बसला होता. जेजींना पाहताच तो जरा सावरून बसला. "जमलं का जेवणाचं..?" जेजींनी विचारलं.

"अगदी झकास.." गणपत म्हणाला, "तुमचं झालं सर्व पाहून..?"

"हो तसं पहाण्यासारखं काहीच नाही म्हणा.." जेजी म्हणाले, "निदान दिवसाउजेडी तरी काही नाही - आणि दिसण्याची अपेक्षाही नव्हती -" शेवटलं वाक्य उच्चारताना जेजी गणपतच्या चेहऱ्याकडे अगदी निरखून पाहात होते. पण त्याच्या चेहऱ्यावर नवल शंका सुटकेची भावना असं काहीही दिसलं नाही.

"मग काय निघायचं का परत साहेब..?"

"आता कसली घाई आहे..?" जेजी म्हणाले, "तुमचा तसा नास्ता झालाच आहे, बसू की जरावेळ आरामात गप्पागोष्टी करत - म्हणजे असं की मिस्त्री - लहानपणापासून तुम्ही गावात वाढलेले - वाड्यासंबंधात गावात काय बोलणं होतं, काय काय अफवा आहेत, तुमच्या कानावर आलेलं असणारंच - खरं तर तीच माहिती घेण्यासाठी मी माहुलगावात आलो आहे - आणि दुसरी महत्वाची गोष्ट - मला माहीत आहे तुमच्या मागे कामं असतात - वेळ वाया दवडून तुमचं नुकसान करायची माझी अजिबात इच्छा नाही - तेव्हा आधी हे घ्या -" जेजींनी खिशातून पाकीट काढलं आणि शंभराची एक नोट गणपतपुढे केली. हे उघड होतं की हे त्याला अगदी सर्वस्वी अनपेक्षित होतं.

"अहो साहेब..! हे काय भलतंच..!" जरा मागे सरत तो म्हणाला, "नाहीतरी चार वाजेपर्यंत रोज घरी आरामच करतो - आणि अशी काय हो मोठी कामाची रांग लागून राहिली आहे मागे..! छे..! पैसे कसले देता..!"

नोट मागे न घेता जेजी म्हणाले, "मिस्त्री ही रक्कम अगदी स्वखुषीने देत आहे. तशी बाहेरून वाड्याबद्दल काही काही माहिती मिळाली असती खरं-खोटं कोणास ठाऊक. पण प्रत्यक्षच वाडा आतून बाहेरून दाखवून तुम्ही माझ्यासाठी केवढं महत्वाचं काम केलं आहेत याची तुम्हाला कल्पना नाही - तेव्हा पैसे अगदी निःसंकोचपणे घ्या - " जरा विचार करून शेवटी गणपतने ती नोट खिशात घातली.

क्रमशः

(तळटीप: - ग्रुपवरील अ‍ॅडमीनच्या पूर्वपरवानगी शिवाय ही कथा इतर कुठेही पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे.)

भाग ०१                                                 भाग ०३ 

0 comments:

Post a Comment