Disclaimer     
            Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~

Sunday, 21 January 2018

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ भाग ०३


~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~
मूळ लेखक - नारायण धारप आणि डॉ. अरुण मांडे

भाग ०३

"वाड्याचं विचारता ना साहेब, तशा अनेक अफवा आहेत, हे खरं. एक मात्र खरं, चारपाच पिढ्यांपूर्वी सरदारांच्या घराण्यात भावाभावात काहीतरी बेबनाव झाला. इस्टेटीवरून असेल, बाईवरून असेल, नाहीतर आणखी काहीतरी कारणाने असेल - पण तंटा बखेडा झाला हे नक्की. प्रकरण वाढत वाढत अगदी विकोपाला गेलं - आणि असं म्हणतात की दोघांपैकी एकाने कोणीतरी मांत्रिक आणून काहीतरी चेटूक करणी केली. नवल आहे की या एका गोष्टीवर सर्वांचं एकमत आहे. वाड्यात बाहेरून काहीतरी आणलं गेलं ही गोष्ट खरी. हे सगळ्याचं मूळ. मग वर खऱ्याखोट्याच्या, कल्पित - अफवांच्या कितीतरी फांद्या फुटल्या आहेत. कोणी म्हणतात दुसऱ्या भावाने गळफास लावून स्वतःचा जीव दिला आणि मग भावाला पछाडलं, कोणी म्हणतात त्या दुसऱ्या भावाला वेड लागलं, मरेपर्यंत एका खोलीत कोंडून घातला होता, कोणी म्हणतात तो गायबच झाला, त्याची काही खूणसुद्धा सापडली नाही - पण मग अवशीला रात्री, अंधारात कोणकोणाला काहीकाही - ते भाऊचं असं, कोणी म्हणत नाही - दिसायला लागलं. खरी गोष्ट एकच आहे - वाड्यावर माणसाला राहणं दिवसेंदिवस कठीण व्हायला लागलं. तेव्हा आतासारखी वीजबत्ती कुठं होती..?

 पण त्या नाहीतर कंदील नाहीतर चिमण्या - आणि गडीमाणसांना काय प्रत्येकाला दिवा देणार..? अंधारी खोली ओलांडायची म्हणजे जिवावरचं काम - कोणत्या कोपऱ्यातून नाहीतर कोणत्या दारामागून काय सरपटत पुढे येईल आणि गळ्याला मिठी मारील कशाचा नेम नव्हता - पैशासाठी माणूस श्रम करील, काबाडकष्ट करील पण अशी चोवीस तास गळ्याला तात थोडीच लावून घेणार आहे..? शेवटी काय - गडीमाणसंच वाड्यावर येईनाशी झाली - आणि आणखी - एक सरदारांना सोयरीक करण्यातही खूप अडचणी यायला लागल्या - अशा वाड्यात पंधरासोळा वर्षांची मुलगी कोण पाठवणार हो..! पैसेआडके दागिने रगड असतील - पण जीवाला शांतता मिळायला नको का..? वीस एक वर्षांतच वाड्यावरची सर्व माणसं हलली. आणि वाडा ओसाड पडला - तो आजतागायत तसाच आहे -"

"पण म्हणजे त्या भावाने मांत्रिकाकरवी वाड्यात आणलेलं अजून तिथंच आहे..?" जेजींनी विचारलं. आणि त्या प्रश्नाने प्रथमच गणपतच्या चेहऱ्यावर जराशी अस्वस्थता येऊन गेली.

"साहेब, तुमच्याशी खोटं बोलत नाही, मीसुद्धा वाड्यावर अवशीच्या वेळपर्यंत थांबत नाही - रात्रीची तर गोष्टच सोडा -"

"म्हणजे मिस्त्री, तुम्हालाही काहीतरी अनुभव आला आहे तर..!"

"त्याचं काय आहे साहेब, अगदी सरळ विचारलंत - काय दिसलं..? - तर काही सांगता यायचं नाही - पण वाड्यात वावरताना जीव कसा टांगणीला लागलेला असतो बघा. ती बिगाऱ्यांची जोडी काम करीत असते त्याने जरा धीर येतो हे खरं - पण समजा ते तळमजल्यावरच काही ठोका ठोक करत असले आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरच्या खोल्यांची दारं बघायला वर गेलो तर एखाद्या खोलीतूनच ठकठक आवाज येतोसा वाटतो - वाड्याचं काही खरं नाही बघा - कधी नजर फसेल सांगता येत नाही - एकदा तिसऱ्या मजल्यावर गेलो होतो तर वरून खाली यायचा जिनाच सापडेना..! मग सज्जातून बिगाऱ्याला हाक दिली - जरा वर येरे..! आणि मग तो वर आला तसं काहीतरी थातूरमातूर काम सांगून त्याच्या मागोमाग खाली आलो - तुम्ही म्हणता तेच खरं साहेब, वाड्यात जे एकदा शिरलंय ना ते तिथंच आहे - आता काय आहे, काय करतं कोणास माहीत..!"

गणपतचे शब्द ऐकता ऐकता जेजींचे अनेक अंदाज खरे ठरले होते. गणपतची त्यांना फारच मोलाची मदत झाली होती आणि त्यांनी मनाशी ठरवलेला कार्यक्रम प्रत्यक्षात उतरलाच तर पुढेही त्याची मदत होण्यासारखी होती. तेव्हा त्याला दिलेली रक्कम अगदी सत्कारणी लागली होती.

"मिस्त्री, आता एक शेवटचा प्रश्न - सध्याच्या सरदार रावतेंशी तुमचा संपर्क कसा होतो..? समजा त्यांना किंवा तुम्हाला एकमेकांना काही सांगायची वेळ आली तर..?"

"मालकांनी पत्ता देऊन ठेवला आहे की आपल्याजवळ.."

"मग तो पत्ता सांगता का..? जमलं तर त्यांना प्रत्यक्षच भेटण्याची माझी इच्छा आहे - "

"पण साहेब, पत्ता देतो, पण सांभाळून.."

"म्हणजे कसं..?"

"म्हणजे तसं खानदानी रक्तच नाही का..? तेव्हा आपल्या इभ्रतीला, आपल्या मानापमानाला फार जपणारा माणूस बघा..! एखादा जरी अधिकउणा शब्द गेला तरी माथं भडकलंच म्हणून समजा..!"

"अगदी ध्यानात ठेवीन. द्या. पण तुम्ही दिला आहे हे मात्र त्यांना सांगावंच लागणार नाही का..? त्याला काही हरकत नाही ना..?"

"त्यात कसली हरकत..? त्यांचा पत्ता काय कोणालाही सापडेल.."

जेजींनी पत्ता लिहून घेतला. एव्हाना दुपारचे चार वाजत आले होते. गणपतच्या मोटारसायकलवरून दोघं माहूलगावात परत आले. झाडाखालच्या बस स्टॅन्डजवळच्या हॉटेलमधे दोघांनी चहा, मिसळपाव खाल्ला आणि जेजींचा निरोप घेऊन गणपत त्याच्या वर्कशॉपकडे गेला.

परतीची एसटी साडेसहाला आली. आठ वाजता जेजी त्यांच्या घरी परत आले. एका दिवसांत अपेक्षेपेक्षा खूपच जास्त साध्य झाल्याचं समाधान काही औरच होतं.

~~~~~~~~~

सरदार रावत्यांना जेजींनी पत्र लिहिलं ते खूप विचार करूनच लिहिलं. वर आपला पत्ता असलेला कागद जेजींनी वापरला होता.

श्रीयुत संभाजीराव रावते यांस
डॉक्टर जे. जी. दाभाडे यांचा सप्रेम नमस्कार

आपला माझा पूर्वीचा परिचय नाही तेव्हा या पत्राचं आपल्याला खूप नवल वाटणार आहे पण पत्र पूर्ण वाचल्यावर सर्व गोष्टींचा खुलासा होईल अशी मला आशा आहे.

मी वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टर नाही तर अॅन्थ्रोपॉलॉजीतला म्हणजे मानवंशशास्त्रातली पीएचडी केलेला डॉक्टर आहे. माझा जो एक वैयक्तिक छंद आहे त्यासाठी मला या विषयाचा अभ्यास उपयोगी पडला एवढी प्रस्तावना पुरे.

संभाजीराव, मी पत्रात सर्वकाही स्पष्ट्पणे, कोणताही आडपडदा न ठेवता, लिहिणार आहे. कदाचित आपणास ते अप्रिय वाटेल, पण कोणतेही गैरसमज राहणार नाहीत.

तर माझा छंद.

सर्वांचाच त्यावर विश्वास बसत नाही, पण आपल्या कानावर अशा अनेक जागांबद्दल काही काही प्रवाद येतात. म्हणजे या जागा झपाटलेल्या आहेत, पछाडलेल्या आहेत, तिथं कोणत्यातरी दुष्ट अमानवी घातकी शक्तीचा वावर आहे - थोडक्यात त्या जागांबद्दल सर्वत्र एक विलक्षण दुष्किर्ती पसरलेली असते. संभाजीराव, गोष्ट कटू आहे, पण सत्य आहे. माहूलगावचा आपला वाडा अशाच कारणाने कुप्रसिद्ध झाला आहे. अर्थात ही गोष्ट जगजाहीर झालेली आहे आणि अर्थात आपल्याकडे त्याचा काहीही दोष नाही. अशा जागांना जमल्यास भेट देणं, तेथील पूर्वेतिहासाची माहिती घेणं, कोणास त्या जागेवर काही विलक्षण वा अनैसर्गिक वा भयानक अनुभव आला असेल तर अशा व्यक्तीशी प्रत्यक्ष संपर्क साधून सत्य जाणून घेणं हा माझा नेहमीचा उद्द्योग आहे. हे सर्व कशासाठी याचा सुगावा नंतर होईलच.

त्याचबरोबर वर्तमानपत्रातून, टीव्हीवर अनेक वेळा काही काही लोकांना काही काही चमत्कारिक अनुभव आल्याच्या बातम्या येत असतात. एखाद्याला आपल्या पूर्वजन्मीची ठिकाणं, पूर्वजन्मीच्या घटना - इतिहास आठवणं, या गोष्टी तर टीव्हीवर नेहमी पहायला मिळतात. काही काही वेळी एखाद्या संपूर्ण गावालाच वेडाची लागण झाल्याच्या बातमी येतात. आपल्याकडे हैदराबादमधील एका खेड्यात चार स्त्रियांना आपल्या मागे सैतान लागला आहे असे भास होत होते अशी एक बातमी होती. काही काही वेळा घरांवर लहानमोठे दगडगोटे पडण्याच्या बातम्या येतात - ही यादी न संपणारी आहे. जमलंच तर अशाही व्यक्तींना मी भेटी देण्याचा प्रयत्न करतो.

निरीक्षक नसेल तर घटनांना अस्तित्व राहत नाही हे तर अगदी प्राथमिक सत्य आहे. माझा विचार त्याही पुढे जातो. निरीक्षक घटनांवर काही खास परिणाम घडवतो का..? वर मी ज्या दूषित जागा आणि अनैसर्गिक अनुभव यांचं वर्णन केलं त्याबाबतीत तर हा विचार अधिक महत्वाचा ठरतो. काही ठराविक माणसांनाच हे अनुभव का येतात..? किंवा काही काही जागांमधे मानवातील असे काही घटक उद्दीपित करण्याची क्षमता असते का..? थोडक्यात म्हणजे योग्य ठिकाणी योग्य माणूस पोहोचला तरच या घटना घडतात का..?

तुमच्या लक्षात येईल की सर्वसाधारणपणे स्पष्टीकरणाच्या चौकटीबाहेर राहणाऱ्या या घटनांना काही शास्त्रशुद्ध उपपत्तीने कार्यकारणभावाच्या साखळीत बांधता येईल का या हेतूने माझे सर्व प्रयत्न सुरू असतात. हे सर्व वाचल्यावर आपणास माझ्या पुढील लेखनाचा संदर्भ लागेल.

मी माहूलगावला भेट दिली. गणपत मिस्त्री हे नाव माझ्या कानांवर आले. मी त्यांची भेट घेतली. आणि माझ्या विनंतीवर त्यांनी मला माहूलगावच्या सरदार रावते वाड्यावर नेलं. एवढंच नाही स्वतःजवळच्या किल्ल्या वापरून त्यांनी मला वाड्याचा अंतर्भाग पाहण्याचीही संधी दिली. संभाजीराव आपल्या परवानगीशिवाय मी आपल्या वास्तूत प्रवेश केला याचा आपल्याला राग आला तर मी तो समजू शकतो आणि त्याबद्दल आपली माफीही मागतो. पण यात जो काही दोष असेल तो माझा एकट्याचा आहे, त्या गणपत मिस्त्रीचा यात काहीही दोष नाही, एवढी गोष्ट कृपया लक्षात घ्या.

आता माझ्या पत्राचा हेतू सांगतो. आपल्या माहूलगाव येथील वाड्यासंबंधातच मी आपली भेट घेऊ इच्छितो. मी आधीच स्पष्ट करतो की मी काही कोणी मांत्रिक चेटक्या नाही, अडचणींचा बंदोबस्त करण्याची आश्वासनं देणाऱ्यापैकी नाही. मी या विषयाचा एका फार वेगळ्या पद्धतीने अभ्यास करत आहे.

आपण मला जर काही वेळ देऊ शकलात तर मी माझी कल्पना आपल्यासमोर सविस्तरपणे मांडू शकेन. होकार नकार हा शेवटी सर्वस्वी तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. निदान माझी बाजू मांडण्याची संधी आपण मला द्यावीत एवढीच विनंती आहे. सोबत माझा पत्ता असलेले पाकीट पाठवत आहे.

कळावे,

आपला
डॉ. जे. जी. दाभाडे

पत्र पुन्हा एकदा वाचून त्यात काही गैर नाही अशी खात्री झाल्यावर जेजींनी पत्र पाकिटात बंद केलं आणि पोष्टात टाकून दिलं. त्यांच्यापुरतं त्यांनी काम केलं होतं - आता वाट पाहत राहणं एवढंच त्यांच्या हाती होतं. पाच दिवसांनी - अपेक्षेपेक्षा लवकरच - पत्राचं उत्तर आलं. पत्र रावतेसरदारांच्या हाताखालच्या कोणा कारकुनाने लिहिलं असावं.

डॉ. दाभाडे यांस,

पुढच्या आठवड्यात मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास तुम्ही सरदार संभाजीराव रावते यांना भेटण्यासाठी येऊ शकता.

खाली सरदार रावते यांच्यासाठी अशा अक्षरावर काहीतरी फर्राटे मारलेली एक न वाचता येण्यासारखी सही होती.

~~~~~~~~~

मंगळवारी दहाला पाच मिनिटं कमी असताना जेजी त्या पत्त्यावर हजर झाले. पत्ता एका प्रशस्त बांधल्याचा होता. कंपाउंड बाग, कारंजे, क्रेझी पेव्हमेंट, फ्लॉवर बॉर्डर, मोठ्या रंगीत प्लॅस्टिकच्या छत्रीखालच्या वेताच्या मेज आणि खुर्च्या सर्व काही मालकाची आलिशान राहणी दाखवीत होतं.

मोठ्या दारावरची घंटी वाजवताच गड्याने दार उघडले. आत प्रवेश करता करता जेजी म्हणाले, "डॉक्टर दाभाडे.."

"बसा मी मालकांना सांगतो.." गडी दारातून आत गेला आणि लागलीच बाहेर आला. तिथूनच त्याने जेजींना त्या दारातून आत येण्याची खूण केली. खोलीत टेबलामागे एक मध्यमवयीन गृहस्थ उभे होते. जेजींना पाहताच ते म्हणाले, "डॉक्टर दाभाडे या माझ्याबरोबर.."

त्यांच्या मागोमाग जेजी आतल्या खोलीत गेले. संभाजीरावांचं हे ऑफिस असावं. त्यांचा व्यवसाय काय होता किंवा काही व्यवसाय होता की नाही याची जेजींना काहीही कल्पना नव्हती. एका प्रशस्त टेबलामागे बसलेले गृहस्थच संभाजीराव असावेत. बसलेले असूनही त्यांची उणीपुरी उंची, दणकट शरीरयष्टी सहज ध्यानात येत होती. झुपकेदार मिशा होत्या. वर्ण सावळा होता. वय पन्नाशीच्या आसपासचं असावं. केसाना चंदेरी झाक आली होती. त्यांनी एक हात हलवताच जेजींबरोबर आलेला इसम बाहेर गेला. उभ्याउभ्याच संभाजीरावांना नमस्कार करीत जेजी म्हणाले,

"मी डॉक्टर दाभाडे.."

"या बसा.." संभाजीरावांचा आवाजही शरीरयष्टीला साजेसाच गडगडाटी होता. समोरच्या खुर्चीकडे त्यांनी बोट केलं. खुर्चीत बसता बसता जेजी म्हणाले, "भेटीसाठी आपण वेळ दिलात त्याबद्दल आपला आभारी आहे.." खुर्चीत बसल्यावर जेजींची नजर समोरच्या टेबलाकडे गेली तेव्हा त्यांना दिसलं की टेबलावर एकच कागद होता तो म्हणजे त्यांनी पाठवलेलं पत्र. त्यावर एक बोट आपटत संभाजीराव म्हणाले, "डॉक्टर, तुमचं पत्र मी वाचलं. एकदा नाही तीनदा वाचलं, पण खरं सांगू का, मला त्याचा काहीही अर्थबोध झाला नाही. ही तुमची पीएचडीची डिग्री, तुमचा छंद, आमच्या माहूलगावचा वाडा, यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे काही केल्या माझ्या ध्यानात येत नाही.."

"मी शक्य तितके स्पष्ट करून सांगतो.." जेजी म्हणाले. "अशा प्रकारच्या अनैसर्गिक घटनांचा मी अभ्यास करीत असतो आणि मोठ्या खेदाने मान्य करावं लागतं की बहुतेक घटना गैरसमाजातून किंवा मनाच्या पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या असतात. त्यांना अनेक साक्षीदार असतात - अशा घटनांमागे काही तरी कारण असलंच पाहिजे - ते शोधण्याचा माझा प्रयत्न आहे.."

"ठीक आहे, पण आमच्या वाड्याचा यात कोठे संबंध येतो..?"

"संभाजीराव, मी एक प्रश्न विचारू..?"

"विचारा.."

"तुमच्या वाड्यात तुम्हाला स्वतःला काही विलक्षण अनुभव आला आहे का..?"

संभाजीरावांच्या गप्प बसण्यातच जेजींच्या प्रश्नाचं अर्ध उत्तर होतं. त्यांना बोलतं करण्यासाठी जेजी म्हणाले, "संभाजीराव, मी तुमच्या वाड्यात गेलो होतो. खालपासून पार वरपर्यंत सर्वत्र गेलो होतो - पण तिसऱ्या मजल्यावरच्या एका खोलीसमोर मला एक विलक्षण अनुभव आला - आपण एखाद्या प्रचंड वावटळीत सापडलो आहोत, आपण एखाद्या खोल विवरात पडत आहोत, आपण एखाद्या धबधब्याच्या पाणकाठावरून खाली भिरकावले जात आहोत अशी विलक्षण जाणीव झाली - माझी तर अगदी पाचावरच धारण बसली होती - दचकून मी मागे सरलो - पण पाचसात मिनिटांनी पुन्हा पुढे गेलो तर काय...? काहीही नाही..! मनाचा हिय्या करून खोली उघडली - पण काय..? काही नाही..! साधी रिकामी खोली. पण ते पाचसात सेकंद माझ्या आठवणीतून कधीही जाणार नाहीत."

"डॉक्टर, तुम्ही एवढं खुलासेवार सांगितल्यावर मग मला गप्प राहून चालणारच नाही, नाही का..? त्यावेळेसचं माझं वागणं आठवलं कि मला माझी स्वतःची शरमच वाटते - अर्थात हा कदाचित फाजील आत्मविश्वासही असेल - तुमचा प्रश्न विचारण्याआधीच मी त्याचं उत्तर देऊन टाकतो. त्या प्रसंघाची शहानिशा करण्याचा. खरेखोटेपणा ठरवण्याचा प्रयत्न मी नंतर कधीही केला नाही. साधारण पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एप्रिल-मे चे उन्हाळ्याचे दिवस होते. खरंतर संध्याकाळी अगदी सात वाजेपर्यंत ऊन असतं. तेव्हा साधारण चारच्या सुमारास मी निघालो आणि गणपतला घेऊन साडेचारपर्यंत वाड्यावर पोचलो. आमच्यात एक अलिखित करार आहे - दोघांनी वाड्यात असताना सतत एकमेकांबरोबर असायचं. एकानं इकडे दुसऱ्यानं तिकडे अशी फाटाफूट होऊ द्यायची नाही. आम्ही दोघं वाड्यात शिरलो तेव्हा पश्चिमेकडून खूप दाट काळ्या ढगांची रास पुढे सरकत होती. म्हटलं उन्हाळ्यातला वळवाचा पाऊस - पंधरा वीस मिनिटं कोसळेल, कि लगेचच आकाश मोकळं होईल. पण निसर्ग मोठा लहरी असतो हेच खरं."

"आम्ही वाड्यात शिरलो आणि एकदम अंधारून आलं. आणि पाहता पाहता धुवाँधार पावसाला सुरुवात झाली. आमच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही खालपासून वरपर्यंत एकेक खोली पाहात निघालो. सगळ्या खिडक्या व्यवस्थित लागल्या आहेत कि नाहीत हे तर बघायलाच हवं होतं. होता होता आम्ही तिसऱ्या मजल्यावर पोचलो. आणि शेवटचं वळण घेऊन येत होतो तर त्या खोलीतून मला काहीतरी आवाज कानावर आल्याचा भास झाला - आता खरं तर पावसाच्या त्या ताडताड आवाजात इतर काही ऐकू येण्याची शक्यताच नव्हती - पण माणसाला शहाणपण मागाहून सुचतं ना..! मी खोलीचं दार उघडून आत नजर टाकली -

तशी अंधारलेलीच खोली - पण आत काय होतं ते दाखवण्याइतका प्रकाश खासच होता. छताच्या काडीला दोरी बांधली होती. आणि त्या दोरीचा गळफास लावून त्यानं आत्महत्या केली होती - पण काही काही वेळा असा काही शॉक बसतो की काही क्षण विचार, हालचाल सारं काही पार थांबतं. मला वाटतं पाचसात सेकंद मी नुसता समोर पाहात उभाच राहिलो असेन - मग काहीतरी ओरडून मागे सरलो. गणपत एव्हाना पाचसात पावलं पुढे गेला होता, त्याने मागे वळून पाहिलं - माझ्या चेहऱ्यावरूनच त्याला जाणवलं की काहीतरी भलतंच झालं आहे. तो घाईघाईनं माझ्याजवळ आला. माझी अवस्था बोलण्यापलीकडची होती. मी फक्त त्या खोलीकडे बोट करीत होतो. गणपतनं त्या उघड्या दारातून आत नजर टाकली आणि त्याला काही दिसलं नाही आणि मिनिटभरानं मी परत खोलीच्या दाराशी गेलो तेव्हा मलाही काही दिसलं नाही - अर्थात मला काही विचारायची गणपतची हिम्मतच होणार नव्हती - आणि मीही त्याच्यापाशी एका शब्दानेही काही बोललो नाही. तेही बरंच झालं म्हणा - आधीच वाड्यासंबंधात अफवा काय कमी होत्या..? त्यात आणखी भर पडायला नको होती."

क्रमशः...

(तळटीप: - ग्रुपवरील अ‍ॅडमीनच्या पूर्वपरवानगी शिवाय ही कथा इतर कुठेही पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे.)

भाग ०२                                                 भाग ०४

0 comments:

Post a Comment