Disclaimer     
            Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~

Wednesday, 24 January 2018

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ भाग ०४

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~
मूळ लेखक - नारायण धारप आणि डॉ. अरुण मांडे 
भाग ०४

संभाजीराव बोलायचे थांबले. ते खाली पहात टेबलावर बोटांनी टकटक आवाज करत होते. जेजींच्या ध्यानात आलं - वेळ मोठा बांका होता. अधिकउणा एक शब्दही मुलाखतीचा बेरंग करू शकला असता. पण मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मनात जो विषय सतत घोळत असतो, त्याचं सूतोवाच करायला आपोआपच त्यांच्यासमोर एक नामी संधी चालून आली होती. खुर्चीवर जरा पुढे वाकून जेजी म्हणाले, "संभाजीराव, तुम्हाला दिसलेल्या दृश्याचा आपण दोन दिशांनी विचार करू शकतो. ज्या अर्थी गणपतला - आणि अर्थात नंतर तुम्हालाही - त्या खोलीत दिसलं नाही त्या अर्थी त्या दृश्यास सत्यसृष्टीतलं कोणतंही परिणाम नव्हतं - याचा अर्थ ते दृश्य एका अर्थी असत्य होतं. तुमच्यापुरती साकार झालेली एक प्रतिमा होती - पण एखाद्या घटनेला केवळ असं एखादं लेव्हल लावून त्या घटनेचं स्पष्टीकरण होत नाही. समजा तुम्हाला भास झाला - पण तो का झाला..? आणि तुम्हाला त्यात असं शोकांत, जरा भयानक असं दृश्य का दिसलं..? संभाजीराव, गेली कितीतरी वर्ष मी या घटनांचा अभ्यास करीत आहे आणि माझ्यापुरती मी एक उपपत्ती निर्माण केली आहे."

एक हात वर करून संभाजीरावांनी जेजींना मधेच थांबवलंच. जेजींना वाटायला लागलं आपण या संभाजीरावांच्या अगत्याचा गैरफायदा घेत आहे. आवाज जरा खाली आणून जेजी म्हणाले, "संभाजीराव माझ्या ध्यानातच राहिलं नाही, की तुमचा वेळ अतिशय मोलाचा आहे - मी आपली व्याख्यानबाजीचं करीत राहिलो -"

जरासे हसत संभाजीराव म्हणाले, "डॉक्टर, एवीतेवी आपण एकमेकांशी प्रामाणिक राहायचं ठरवलंच आहे - तेव्हा ऐका - अहो, कसला महत्वाचा वेळ..? मला अशी काय मोठी कामं असतात..? हे ऑफिस म्हणजे नाटकातला एक देखावा आहे. बाकी काही नाही. वडिलोपार्जित गडगंज संपत्ती हाताशी आहे - कुशल आणि प्रामाणिक सल्लागारांच्या मदतीने मी तिची राखण तर केलीच आहे - त्यात थोडीफार भरही घातली आहे. डॉक्टर, तुम्हाला कल्पना नाही, मला भेटायला येणाऱ्यांपैकी पंच्याण्णव टक्के लोक मनाशी काहीतरी उद्देश ठेवून येतात. पैसे आहेत ना, मग कोण कोण तिकडे आकर्षित होईल काय सांगता येणार..? तुमच्याशी मी ज्या मोकळेपणाने बोललो तितका कितीतरी दिवसात कोणाशीही अगदी कुटुंबातल्या व्यक्तीशीही बोललो नाही. मला काहीही काम नाही. हवा तेवढा वेळ आहे. तुम्हाला थांबवलं ते एवढ्यासाठी की आपली एक कॉफी होऊन जाऊ दे. मग आपल्याला हवा तेवढा वेळ आहे. ठीक आहे..?"

जेजींनी हसत मानेनेच होकार दिला.

कॉफीचे मग हलवले गेल्यानंतर जेजी म्हणाले, "संभाजीराव, जरा विषयांतर करून बोलतो. सुरुवातीस माझे शब्द तांत्रिक क्लिष्ट वाटतील, पण जरा दमाने घ्या. रोजचं उदाहरण घेतो. आपण हातावर हात चोळले की हात गरम होतात, उष्णता निर्माण होते. कुठून आली ही उष्णता..? हातांच्या गतीमुळे निर्माण झाली. म्हणजेच घर्षणाने निर्माण झाली. हातावर हात घासण्याची शक्ती ही यांत्रिक शक्ती. तिचं उष्णतेच्या शक्तीत रूपांतर झालं. जगात हे शक्तीचं रूपांतर सर्वत्र, सदासर्वकाळ चाललेलं आहे. वाहत्या पाण्याच्या शक्तीतून विद्द्युतशक्ती निर्माण होते. विद्द्युतशक्तीतून उष्णता आणि शेवटी प्रकाश निर्माण होतो. थोडक्यात एक प्रकारची ऊर्जा दुसऱ्या प्रकारात रूपांतरित होते."

"संभाजीराव, आता आपण आपल्या मनाचा विचार करू. मनात विचार येत असतात. हाही मानसशक्तीचाच एक सौम्य अविष्कार आहे. जेव्हा माणूस काही ना काही कारणाने संतप्त होतो, उद्दीपित होतो, तेव्हा त्याच्या मानसशक्तीची मात्रा खूपच वाढलेली असते. आता यात माझ्या मनातील कल्पना सांगतो. काही काही जागा, परिसर, अवकाश, वास्तू अशा असतात की त्यांच्यात या मानसशक्तीचं रूपांतर दृश्य वा श्राव्य वा स्पर्श रूपात करण्याची क्षमता असते. एकदा हा साधा विचार स्वीकारला की अनेक गोष्टीचं स्पष्टीकरण करता येऊ शकेल. आता तुम्हालाच आलेल्या अनुभवाचं उदाहरण घेऊया. त्या आधी आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी. आपल्या मनाचे सर्वच व्यापार आपल्याला ज्ञात नसतात. काही काही जाणिवेच्याही खालच्या, अव्यक्त पातळीवर चाललेले असतात. आपल्याला ते ज्ञात नसतात, पण त्यांची सत्यता नाकारता येत नाही. या अव्यक्त, अनकॉन्शस विचारांचे विलक्षण परिणाम झालेले दिसतात. त्या मानसशास्त्राशी आपल्याला याक्षणी काही कर्तव्य नाही. अव्यक्त पातळीवरच्या विचारांची सत्यता स्वीकारली की मग घटनांचं स्पष्टीकरण अधिक सुलभपणे होऊ शकतं."

"तेव्हा तुम्हाला आलेला अनुभव. खोलीत कोणीतरी एका अभागी माणसाने आत्महत्या केली होती. जरा खाजगीतील गोष्ट आहे - पण रागावू नका. रावते सरदारांच्या इतिहासात असे प्रकार झालेले आहेत, हो की नाही..? त्या वाड्यात वावरताना कळत नकळत तुमच्या मनात मागच्या या शोकांत घटनेचा काही ना काही विचार चाललेला असणारच पण या वस्तूचा विलक्षण गुणधर्म हा आहे की या अवकाशात मनातल्या विचारांना एक दृश्य स्वरूप येऊ शकतं. तुम्हाला आलेल्या अनुभवाचं माझ्यापुरतं मी केलेलं हे स्पष्टीकरण आहे. अर्थात हे परिपूर्ण नाही. समोर दृश्य झालेला आकार मायावी, भ्रामक, निरुपद्रवी असतो का त्याच्यामधे एखादी विनाशकारी तामसी शक्ती असते..? अनुत्तरित प्रश्न."

"या अनुषंगाने आता मी तुमची कशासाठी भेट घेतली हे सांगण्याची संधी मला मिळाली आहे. ती सांगण्यापूर्वी व्यवहारातलं आणखी एक उदाहरणं देतो. सर्वच पदार्थ उघड्यावर ठेवले की त्यांच्यावर काहीना काही परिणाम होतो. काही बाष्पाच्या रूपाने हवेत कणाकणाने झिरपतात, काही पाणी शोषून जरा दमट होतात, काहींचा प्राणवायूशी संयोग होऊन ते गंजतात. पण काही काही पदार्थांमधे हे गुण अति तीव्र मात्रेमधे असतात. उदाहरणार्थ - आयोडीन. आयोडीनचे स्फटिक उघड्यावर ठेवले तर त्याचा पाहता पाहता वायुरूप आयोडीन होऊन जातो. ते कॅल्शिअम क्लोराईड ते डब्यावर ठेवलं तर इतकं पाणी शोषून घेतं की शेवटी त्याचा अगदी लगदा होतो. नाहीतर तो सोडियम धातू - तो जर उघड्यावर ठेवला तर प्राणवायूशी संयोग करून इतका तापतो की खालचा कागदही होरपळेल. तो सतत पाण्यातच ठेवावा लागतो. माणसाच्या मानसिक व्यवहारातही असा मात्रांचा फरक असतो. संभाजीराव तुमच्या मनात अव्यक्तपणे आलेली कोणा पूर्वजाच्या आत्महत्येची आठवण अगदी पुसट होती - तरीही या वास्तूत तिला एक दृश्य साकार आला. पण ज्यांचे विचार असे खोलवरच्या पातळीवर दडपलेले नाहीत, त्यांचा निर्यास अगदी सतत होत असतो असं जर कोणी या वास्तूत आलं तर..? हा प्रश्न विचारण्याचं एक कारण आहे. इतक्या दिवसांच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर माझी खात्री पटली आहे की अशा अनैसर्गिक घटनांशी काही खास मानसिक धाटणीचे लोक आणि शिवाय काही विशिष्ट गुणधर्म असलेला अवकाश या दोन्हींची आवश्यकता असते. तुमच्या माहूलगावचा वाडा ही या दृष्टीने अगदी आदर्श अशी जागा आहे. गावापासून दूर, उत्तम स्थितीत, राहण्याची छान सोय असलेली अशी जागा म्हणजे एकतर अंधाऱ्या पडक्या वाड्यातली तळघरं, नाहीतर गावठाणाबाहेर मसणवटीजवळचा एखादा मोठा वृक्ष नाहीतर रानावनातली आडबाजुची एखादी कपार - अशा असतात."

"पण तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही अजून सांगितलं नाही डॉक्टर..!"

"ही सगळी प्रस्तावना त्याच्यासाठीच तर आहे. तुम्हाला सांगितलंच आहे, अशा घटनांची मी तपशीलवार नोंद ठेवत असतो. त्यात घरावर दगड पडण्याचे - ज्याला लोक भानामती म्हणतात असे प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीला ती राहात असलेल्या जागी आपल्या पूर्वजन्मीच्या आठवणी आल्याचे प्रसंग आहेत. आणखीही कितीतरी. पण म्हणजे व्यक्ती आणि स्थान दोन्ही घटक महत्वाचे आहेत."

"संभाजीराव आता माझ्या मनातली कल्पना सांगतो. तुमची जर परवानगी असेल तर माहूलच्या तुमच्या वाड्यामधे पूर्वी ज्यांना ज्यांना हे अनुभव आले आहेत अशी माणसं काही दिवसांसाठी राहायला आणायची आणि हे दोन घटक एकत्र आले की काय होतं ते पाहण्याची माझी कल्पना आहे. तुम्हाला आधीच सांगतो - केवळ शाब्दिक परवानगी देण्यापलीकडे तुम्हाला कोणतीही तोशीस पडणार नाही. त्याचप्रमाणे त्या वास्तूत काहीही घडलं तरी त्याची कोणतीही जबाबदारी तुमच्यावर येणार नाही याची मी तुम्हाला लेखी हमी देईन. सर्व परिणामांना सर्वस्वी आम्हीच जबाबदार असू."

"पण डॉक्टर, तिथं तर जेवणाखाणाची काहीच सोय नाही."

"गणपत मिस्त्रीच्या ओळखीने सकाळ संध्याकाळच्या स्वैपाकासाठी आणि धुण्याभांड्याचं काम करण्यासाठी एखादी बाई मिळेल अशी माझी खात्री आहे. मला माहीत आहे, माहूलगावातलं कोणीही वाड्यावर मुक्कामासाठी राहायला तयार होणार नाही - पण आम्ही ती अपेक्षाही करीत नाही. सूर्योदयानंतर बाईने नेमानं भांडी साफ करावीत, सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेवावा. आणि दुपारी धुणीभांडी उरकून दिवस मावळायच्या आत परत गावाकडे जावं. मला वाटतं मनासारखा पगार मिळाला तर एवढ्या कामासाठी बाई नक्कीच मिळेल."

"डॉक्टर, हे सगळे तुमचे अंदाज आहेत. माझा तर तुम्हाला सल्ला आहे की या भानगडीत तुम्ही पडूच नये - पण अगदी मनाशी ठरवलंच असलं तर गावाला पुन्हा एकदा भेट द्या. तुम्ही म्हणता तशी सोय होण्यासारखी आहे का ते पहा - मग आपण पुन्हा भेटूया - माझ्या परवानगीचं म्हणत असाल तर तुमच्या विनंतीला नकार कसा देणार..? शेवटी सर्व जबाबदारी तुम्हीच आपल्या शिरावर घेत आहात की..!"

"संभाजीराव, मी तुमचा खरोखरच आभारी आहे. मनात कल्पना तर आहे - आता काय काय कसं जमतं त्याचा अंदाज घेतो आणि मग पुन्हा आपली भेट घेतो."

जेजी खुर्चीवरून उठताच संभाजीरावही उठले. आणि जेजीचा हात हातात घेत म्हणाले, "डॉक्टर, आज मला खूपच नव्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. तुमची कल्पना प्रत्यक्षात येवो अथवा न येवो आपल्या भेटीगाठी चालूच राहाव्यात अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. रोजच्या घटनांकडे एका एकदम वेगळ्याच नजरेने पाहण्याची दृष्टी तुम्ही मला दिली आहे. त्याबद्दल मला तुमचे आभार मानायला हवेत."

संभाजीरावांना नमस्कार करून जेजी त्यांच्या कार्यालयामधून बाहेर पडले. माहूलगावला दिलेली भेट जशी कल्पनेबाहेर यशस्वी झाली होती. तशीच संभाजीरावांची भेटही अत्यंत आशादायक ठरली होती.

संभाजीरावांनी फारसे आढेवेढे न घेता वाड्यावर मुक्काम करायची परवानगी दिली त्यामुळे जेजींना मोठाच हुरूप आला होता. आता त्यांना आपल्या पुढच्या सर्व कार्यक्रमांची आखणी करण्याचा मार्ग खुला झाला होता. वाड्यावरच्या दोन तीन दिवसांच्या मुक्कामाची त्यांना फारशी फिकीर वाटत नव्हती. दोनतीन दिवस पुरतील असे अन्नपदार्थ बरोबर ठेवले की जेवणाखाण्याचा प्रश्न मिटला. शक्यतोवर पेपर डिश आणि प्लॅस्टिक ग्लास वापरले की भांड्यांचाही प्रश्न निकालात निघत होता. वाड्यावर विहीर असणार. तेव्हा पाण्याचा प्रश्नही नव्हता. ज्यांना ज्यांना ते निमंत्रण करणार होते त्यांनी स्वतःबरोबर तीन दिवसांचे कपडे आणि झोपण्यासाठी होल्डऑल आणायचा होता. तेव्हा गाद्या-चादरी-उशा यांचाही प्रश्न नव्हता. आता वाड्यावर जाण्यासाठी कोणाकोणाची निवड करायची हे ठरवण्याची वेळ आली होती. आणि अर्थात त्यांनी निमंत्रण दिलं की सगळे अगदी लगोलग तयार होतील असं मानून चालणंही चूक ठरणार होतं. काहींचे पत्ते बदलले असतील. काहींना-विशेषतः स्त्रियांना - घरातून विरोध होण्याची शक्यता होती. पूर्वीच्या अनुभवाने जीव पोळल्यामुळे पुन्हा त्या वाटेला न जाण्याचा निर्धारही काहींनी केला असेल. एवढ्या असंख्य चाळण्यातून गाळून शेवट हातात पाचसहा नावं आली तरी भाग्यच. जेजी स्वतःशी विचार करत होते - अनुभव वीस वर्षांपूर्वीपेक्षा जास्त मागचा नको. तसंच व्यक्तीचं वय साधारण पस्तीस छत्तीसपेक्षा जास्त नको.

त्यांच्या टिपणवहीतली नावं पाहता पाहता एका नावापाशी थांबले.

~~~~~~~~~

अनंत सीताराम जोशी. वय वर्ष चौदा. वडील भिक्षुकी करणारे. आई घरीच पापड कुरड्या, इत्यादी जिन्नस करून विकत असे. शहरातल्या अगदी जुन्या वस्तीत दामले यांची एक चाळ वजा इमारत होती. तीसपस्तीस भाडेकरू तरी नक्कीच असतील. हे जोशी कुटुंब तिसऱ्या मजल्यावरच्या दोन खोल्यांच्या जागेत राहात असे. वर छप्पर म्हणजे नालीचे पत्रे. तशी उन्हाळ्यात अंगाची अगदी लाही लाही व्हायची - पण त्या तापत्या छपराचा एका मोठा फायदा होता. अनंताची आई, जेनुबाई, तिचं कुरड्या, पापडांचं वाळवण पत्र्यावर करू शकत होती. वाड्यात अंगण होतं पण तिथे कधी ऊन असायचं नसायचं आणि वाड्यात वावरणारी व्रात्य पोरं अंगणात काय जिनसा टिकू देतात..? आणि वाळवणावर सतत नजर तरी कशी ठेवणार..? तसे सीतारामपंत कुडमुड्या भटजीच्या जातीचेच. जन्मभर हलाखीत दिवस काढल्याने कोणाकडे मान वर करून दोन शब्द सुनावण्याची हिम्मतच अंगात नव्हती. जानुबाई मात्र तोंडाने तिखट, अगंला लगेच कागं करणारी, कोणाचा एक शब्द खाली पडू न देणारी मोठी तोंडाळ बाई. नवल नाही वाड्यातल्या बिऱ्हाडांशी तिचा छत्तीसचाच आकडा होता. आणि मालक तर सदान् कदा संतापलेले. पत्रा काही तुम्हाला भाड्याने दिलेला नाही - त्याचा तुम्ही गैरवापर करता आहात - वकिलामार्फत नोटीसच देणार आहे - ते नेहमी धमकी देत - पण वकिलाच्या नोटिशीचे दहापंधरा रुपये देण्याची तरी त्यांची ऐपत कोठे होती..? बिऱ्हाडांची भाडी काय तर आठ दहा बारा रुपये अशी. शिवाय हजार तक्रारी. त्यानी ते आधीच कावलेले. त्यात ही आणखी भर घालून घ्यायची त्यांची कुवतच नव्हती. शेवटी मध्यमवर्गीय मन - खरे किंवा काल्पनिक अन्याय स्वतःवर चरफडत सहन करण्याची त्यांचीही मध्यमवर्गीय मानसिकता होतीच.

अशा या जोशी कुटुंबाचं नाव एकदम वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं. त्यांच्या पत्र्यावर रात्री दगड पडण्याचा आवाज यायला लागला. दगडांचा आवाज येत होता हे निर्विवाद सत्य आहे. त्याला अक्षरशः शेकडो लोकांचा पुरावा होता. आता अशी अनैसर्गिक घटना म्हणजे अफवांना निमंत्रणच की..! नाही नाही त्या तर्ककुतर्कांचं मोहोळ उठलं नाही तरच नवल..! अंधश्रद्धाळू आणि भाकडकथांवर विश्वास ठेवणारांच्यात पहिली आवई उठली ती भानामतीची. हौशे आणि नवशे सदासर्वकाळ असतातच. अपघात झाला तर ती जागा पाहायलासुद्धा माणसं जमतात. तेव्हा नवल नाही या जोश्यांच्या घराची वर्दळ एकदम वाढली तर..! इतर वेळी जनूबाई दिसली की नाक मुरडणाऱ्या शेजारणी "हे काय झालं हो..? असं कसं झालं हो..! काय अक्रित आलंय तुमच्यावर..!" असल्या कोरड्या आणि खोट्या सहानुभूतीचे चार थेंब टाकण्यासाठी जोश्यांच्या घरात यायला लागल्या. खरं तर सर्वांनाच जिथे दगड पडण्याचा आवाज येत होता ती छपरावरची पत्र्याची जागा पहायची होती. वर जायला बाहेरच्या खोलीतूनच शिडी होती आणि वर चार बाय तीनचं पत्र्याचंच वर ढकलून उघडायचं दार होतं. पण जनुबाईनी त्या दाराला कुलूपच लावून टाकलं होतं. कोणालाही वर जाऊ दिलं नाही.

अर्थात प्रकरण शेवटी शेजारच्या पोलीस चौकीपर्यंत पोहोचलंच. अर्थात तसा कोणालाही प्रत्यक्ष त्रास किंवा इजा किंवा नुकसान झालं नव्हतं. पोलीस तरी काय नोंद करणार..? पण एकदोन वजनदार लोकांच्या आग्रहाखातर शेवटी एक साधा पोलीस चौकशीसाठी जोश्यांच्या घरी आला आणि अर्थात त्याच्यासाठी आणि त्याच्याबरोबरच्या वशिल्याच्या एकदोघांसाठी - जनुबाईना वरचं दार उघडावं लागलं. पत्र्याचा आकार साधारण बावीस बाय बाराचा होता. पण वर येताच आधी दिसले ते साधारण मुठीएवढे पाचसहाशे ग्रॅम वजनाचे पंधरा सोळा दगड आणि अर्ध्या विटांचे चारपाच तुकडे. त्या तुकड्यांकडे पाहात शिपाई म्हणाला, "म्हणजे लोकांना दगडाचा आवाज येत होता हे तर खरंच आहे..."

"नाही नाही तसं नाही.." जनूबाई म्हणाल्या.

"तसं नाही..? मग हे दगड विटा आलं कोठून..?"

"अहो, मीच अंताला खालनं आणायला लावलेत.."

"तुम्ही.."

"अहो हे पहा -" जनुबाईंनी कोपऱ्यातली एक मोठी वीट उचलली आणि तिच्याखाली ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या घड्या आणि जुन्या साड्या दाखवल्या. "अहो, मी ही उन्हाळ्याची वाळवणाची कामं करते ना - पापड कुरड्या पापड्या ते इथं पत्र्यावर प्लॅस्टिकवर वाळत घातलेलं असतं - आणि वरून धूळ कचरा पडू नये म्हणून त्यांच्यावर चारी बाजूंनी दगड विटांचे तुकडे असं काहीतरी ठेवते - त्याकरता तर वर असे दगड आणून ठेवलेत."
"पण तुम्हीही दगड पडल्याचा आवाज ऐकलात की नाही..?"

"ऐकलं की..! साऱ्या जगाला ऐकू येतं ते मला येणारंच. पण हे दगड पहिल्यापासूनच आहेत एवढं सांगते -"

जनुबाईच्या शब्दांनी - ज्याला समोर प्रत्यक्ष पुरावा होता - सगळेच एकदम निरुत्तर झाले होते. पाचसात मिनिटं पत्र्यावरच घुटमळून मग शेवटी सगळे खाली आले. मागे जनूबाईंनी दाराला काडी लावून टाकली.

स्वतःशीच काहीतरी पुटपुटत पोलीस निघून गेला. बाकीची माणसंही आपापल्या घरी गेली. जेजींची नोंद थांबली होती. ही घटना एकोणीसशे शहाण्णव मधे घडली होती. म्हणजे बारा वर्षांपूर्वी. त्यावेळी त्यांनी नुकतीच डॉक्टरेट घेतली होती. या जरा आडमार्गावरच्या घटनांचा शोध घ्यायचा असा अर्धवट विचार मनात होता - म्हणून त्यांनी टीव्ही, वर्तमानपत्र, रेडिओ इत्यादी माध्यमातून आलेल्या अशा घटनांची नोंद करून ठेवली होती. पण त्यापुढे काही केलं नव्हतं. मग तीन चार वर्षांनी जेव्हा त्यांनी आपला जीवनमार्ग निश्चित केला तेव्हा या घटनांचा अधिक खोल तपास करण्याची आवश्यकता भासायला लागली.

मग एका सकाळी त्यांनी त्या जोशी कुटुंबालाच भेट द्यायचं ठरवलं, ते त्या पत्त्यावर गेलेही - पण जोशी जागा सोडून गेले होते. आणि त्यांची आसपासच्या कोणाशीच असे आपुलकीचे संबंध नव्हते, की ज्यांना त्यांचा नवीन पत्ता जाणून घ्यायची इच्छा होती. म्हणजे जेजींचा शोध इथंच संपल्यासारखा होता. पण एक अगदी अंधुक अशा होती - सुरुवातीची नावं पाहता एक नाव त्यांच्या समोर आलं.

अनंत सीताराम जोशी

मोठीच दिलासा देणारी गोष्ट. हा अनंत तोच असला तर अर्थात - पण त्यांनी पत्ता आणि फोननंबर आपल्या टिपणवहीत ठेवला. वेळ पडली तर ते या अनंताची गाठभेट घेणार होते.

~~~~~~~~~

क्रमशः...

(तळटीप: - ग्रुपवरील अ‍ॅडमीनच्या पूर्वपरवानगी शिवाय ही कथा इतर कुठेही पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे.)

भाग ०३                                                        भाग ०५

0 comments:

Post a Comment