Disclaimer     
            Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~

Thursday, 25 January 2018

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ भाग ०५

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ 
मूळ लेखक - नारायण धारप आणि डॉ. अरुण मांडे

भाग ०५

तशा त्यांच्या टिपणवहीत नोंदी खूप होत्या - काही परगावच्या काही वेगळ्या राज्यातल्या, काही तर परदेशातल्या, आताच्या क्षणी जेजींना फक्त स्थानिक घटनात स्वारस्य होतं. त्या घटनात गुंतलेल्या लोकांशी संपर्क साधणं सोपं होतं - शिवाय त्यांच्या पुढच्या एका नावापाशी जेजी थांबले.

पारू धोंडिबा म्हातरे.

ही नोंद काही टीव्ही, वर्तमानपत्रं यातील बातम्यांवरून केलेली नव्हती - तर त्यांचे एक मित्र देशपांडे यांच्याकडून त्यांना ती माहिती मिळाली होती. एव्हाना जेजींच्या मर्यादित मित्रपरिवारात त्यांच्या छंदाची सर्वांना माहिती होती. तेव्हा देशपांड्यांचा फोन ही काही फार मोठी अनपेक्षित गोष्ट नव्हती.

"जेजी, वेळ आहे ना - मग एक तर -"

अशी सुरुवात करून देशपांड्यांनी पारूची हकीकत सांगितली होती. पारूचं वय सात-आठ वर्षांचं होतं. तिची आई रखमा देशपांड्यांच्या घरचं काम करीत असे. ती संध्याकाळची घाईघाईने देशपांड्याकडे आली. गेले दोन दिवस पारूला ताप येत होता. पण आता ताप एकदम एकशेपाचच्या वर गेला होता. आणि पारूची शुद्ध हरपली होती. देशपांड्यांनी आपल्या एका निकट स्नेही डॉक्टरांना फोन केला आणि रखमाला पारूला त्यांच्याकडे न्यायला सांगितलं. जेजी, ताबडतोब हालचाली झाल्या म्हणून पारू वाचली - आणखी काहीवेळ गेला असता तर तिची काही धडगत नव्हती. पण योग्य वेळी योग्य ते उपचार झाले आणि तिच्या जीवाचा धोका टळला. चार दिवसांनी तिला त्यांनी घरी आणलं. अगदी खूपच अशक्त झाली होती. मग घरातल्या घरात हिंडायफिरायला लागली होती. जेजी, आता नीट एका हं - एका संध्याकाळी पारुत अगदी विलक्षण विश्वासच न बसण्यासारखा बदल झाला. आता आताशी ती जेमतेम चतकोर भाकरी खायला लागली होती. पण त्या संध्याकाळी काहीतरी भलतंच घडलं होतं. पारुने पानातला भाकरीचा चतकोर तर संपवलाच - "आई, आणखी घाल ना..!" म्हणाली. बिचारी रखमा..! तिला पोर सुधारते आहे याचा केवढा आनंद झाला. तिने पारूच्या पानात आणखी चतकोर वाढला - तोही पारुने पाहता पाहता फस्त केला - आणि मग तर गोष्ट भलत्याच थराला गेल्या. पारूची एक पुरी भाकरी खाऊन झाली तरी ती आणखी मागतच होती. काही केल्या ऐकेना. रखमाला काही हे लक्षण चांगलं दिसलं नाही - पण ती नाही म्हणताच पारुने मोठ्याने भोकाडच पसरलं - "मला भूक लागलीय, आणखी वाढ ना..!" तिचा आपला घोषा सुरूच. शेवटी दोन सबंध भाकऱ्या खाल्ल्या तेव्हाच पारूची भूक शांत झाली. पण हा काही अपवाद नव्हता - प्रत्येक जेवणाच्या वेळी हाच तमाशा. सकाळ संध्याकाळ ही आठ वर्षांची पोर दोन दोन भाकऱ्या खायला लागली.

"जेजी मोठी चमत्कारिक वाटते नाही कां ही हकीकत..? पण हे तर काहीच नाही. आणखी विलक्षण गोष्ट ऐकायची तयारी ठेवा - तर मग ही रखमा बिचारी अगदी घायकुतीला आली होती. तेव्हा मी तिला पुन्हा एकदा पारूला घेऊन डॉक्टरांकडे जायला सांगितलं आणि एकदोन दिवसातच मला डॉक्टरांचा फोन आला "देशपांडे, ही तुमची पारूची केस मोठी विलक्षण आहे हो..!" ते म्हणत होते. "विलक्षण म्हणजे काय..?" मी त्यांना विचारलं. "अहो देशपांडे तिच्या वागण्याचं काही स्पष्टीकरण होत नाही हो - एकदा येऊन भेटता का..? मग प्रत्यक्षच बोलू -"

"जेजी, मी डॉक्टरांच्याकडे गेलो. पारूच्या घरची परिस्थिती काही तिला स्पेशल रुममधे ठेवण्यासारखी नव्हती - पण डॉक्टरांनी तिला एका स्पेशल रुममधे ठेवलं होतं. मी तिथे पोहोचताच ते म्हणाले, "देशपांडे, एकदा या पारूला पाहून घ्या मग आपण बोलू.." आम्ही खोलीत गेलो. पारू खाटेवर झोपली होती. आठनऊ वर्षांची नुकतीच आजारातून उठलेली मुलगी शरीर खंगलेलंच होतं. खाटेशेजारी तिची आई बसली होती. आम्हाला पाहताच ती उठायला लागली. डॉक्टरांनीच तिला बसून राहण्याची खूण केली. आम्ही दोघं खाटेशेजारी चारपाच मिनिटं उभे राहून पारूकडे पाहत होतो. ती अगदी शांत झोपली होती. मग खूण करून डॉक्टरांनी मला त्यांच्या केबिनमधे आणलं. "देशपांडे पाहिलंत ना, आज तिचा तिसरा दिवस आहे. घरची माणसं डबा आणतात - डबा पाहिलात तर तुमचा विश्वास बसणार नाही की हा डबा एका आठनऊ वर्षांच्या आजारी मुलीसाठीचा आहे. अहो, चांगल्या जाड जाड दोन भाकरी, झणझणीत मसालेदार भाजी आणि चटणी. आणि ही पारू ते सगळं एका खेपेत संपवते. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं नसतं तर माझा विश्वास बसला नसता. आणि परत संध्याकाळी तोच प्रकार. तिच्या वजनात एका ग्रॅमनेही वाढ झालेली नाही. बरं एवढं खाते तर काही अपचन झालं आहे, पोट बिघडलं आहे असाही काही प्रकार नाही. सगळ्या शारीरिक तपासण्या केल्या - थोडासा ऍनिमिया आहे - या पारूला इथं कशासाठी ठेवून घ्यायची..? मी तिला काय ट्रीटमेंट देतो आहे..? काही नाही. केस विलक्षण आहे - पण माझ्या अवाक्यापलीकडची आहे." "पण डॉक्टर एखादा स्पेशालिस्ट..?" मी विचारलं. तर ते म्हणाले, "कोणत्या फिल्डमधला स्पेशालिस्ट..? सांगा की. नाही मी तर तिला सरळ घरी पाठवणार आहे. मग खरोखरच त्यांनी तिला दुसऱ्या दिवशी घरी पाठवून दिली."

"मग..?" जेजींचं कुतूहल अर्थात जागं झालं होतं.

"जेजी, डॉक्टर मला एवढं मात्र म्हणाले - देशपांडे, मला हि साधी केस वाटत नाही. शारीरिक तक्रार बिघाड काहीही नाही - मला वाटायला लागलं आहे या पारूच्या मनावरच काहीतरी परिणाम झाला असावा. पण ते क्षेत्र माझं नाही. तिला एखाद्या सायकोथेरपिस्टकडे किंवा एखाद्या सायकियाट्रिस्टकडे न्यावं लागेल आणि या लोकांना ते कसं परवडणार..? तेव्हा तसला व्यावहारिक सल्ला देण्याची चूक मी करणार नाही."

"मग..?" जेजींनी विचारलं.

"मग काय, ती पारू घरी आहे."

"आणि ते खाण्याचं - ते अजूनही -"

"अगदी तसंच जरा जास्तच. आता तर कधी कधी ती घरातली कच्ची भाजीही खाते. घरचे काय करणार बिचारे. मुकाटपणाने जे काय चाललं आहे ते पाहात राहतात आणि आपल्या कर्माला दोष देतात."

"देशपांडे, मला एकदा त्या पारूला भेटता येईल का..?"

"का नाही..? केव्हाही - पण जेजी, तुमचा विचार काय आहे..?"

"मनात एक कल्पना आहे- जरा स्पष्ट झाली की तुम्हाला सांगेनच - पण भेट केव्हा ठरवता..?"

केव्हाही. अगदी उद्याही. ती रखमा माझ्याकडेच कामाला आहे ना. तिला सांगितलं की ती पारूला बरोबर आणेल."

"मग उद्या सकाळी..? नऊ साडेनऊच्या सुमारास..?"

"अगदी नक्की. या तुम्ही नऊ वाजता..."

~~~~~~~~~

अपारंपरिक घटनांचा अभ्यास - निदान नोंद - हेच जेजींचे साध्य होतं. त्यामुळे अर्थात ऍबनॉर्मल सायकॉलॉजी, फोबियाशी, सायकोसिसशी संबंधित घटना त्यांच्या निरीक्षणाच्या परिघात येणार. आणि मानसशास्त्र म्हटलं की हिप्नॉटिझम - संमोहनशास्त्र हेही आलंच. दोन शतके सर्वसामान्य माणसाला ज्ञात झालेली - पण मानवी इतिहासात गुप्तपणे वापरली गेलेली - ही ज्ञानाची शाखा. तिचं अस्तित्व तर नाकारता येत नव्हतंच, पण तिचं समर्पक स्पष्टीकरणही करता येत नव्हतं. हिप्नॉटिझम करणारा आणि हिप्नोटाईज होणारा यांच्यात काही घटक आवश्यक होते का..? काही खास लोकांनाच ही विद्या आत्मसात करता येत होती का..? त्याला काही विशिष्ट प्रकारचा स्वभाव म्हणा, सराव म्हणा, अभ्यास म्हणा, हे काही आवश्यक होतं का..? की ती एक निसर्गदत्त देणगीच होती..? अर्थात जेजींनी त्या विषयाची अनेक पुस्तकं वाचली - आणि त्यांच्या स्वभावास अनुसरून - जमले तसे, जमले तेव्हा प्रयोगही केले. काही वेळा त्यांना यश आलं, काही वेळा ते अपयशी झाले. पण आपल्या शास्त्रांच्या भात्यात आणखी एक बाण जमा झाल्याचं समाधानही लाभलं.

आता एकाएकी त्यांच्या मनात विचार आला, या पारुवर आपण हा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे..? तिला धोका तर काही नव्हता - निदान प्रसंगातली एखादी बाजू अंधारात असेल तर तीही प्रकाशात येईल. मुख्य म्हणजे ज्ञानार्जन याखेरीज त्यांच्या मनात इतर कोणताही हेतू नव्हता.

~~~~~~~~~

बरोबर नऊ वाजता जेजी देशपांड्यांच्या ब्लॉकवर हजर झाले. "या या जेजी," देशपांडे हसत म्हणाले, "या.." दोघं हॉलमध्ये बसले होते.

"काय आली आहे ती पारू..?" जेजींनी विचारलं.

"हो आली आहे - बोलावतोच तिला - पण आधी एखादा कप चहा..?"

"हरकत नाही..." जेजी म्हणाले. चहाचा ट्रे न्यायला रखमा खोलीत आली तेव्हा देशपांडे तिला म्हणाले, "रखमा, पारूला जरा बाहेर पाठवून दे - हे डॉक्टर आहेत - तिला पाहायला आले आहेत - पण तिला सांगू नकोस - नुसती बाहेर पाठव.."

तीनचार मिनिटांत पारू हॉलमधे आली. नऊ वर्ष वयाच्या मानाने शरीराने जरा किरकोळच, रंग खूपच सावळा, पण चेहरा तरतरीत, दोघांकडे आलटून पालटून पाहात ती उभी होती. "बस पारू.." जेजी म्हणाले. ती खुर्चीच्या अगदी कडेवर बसली. खिशातून एक चॉकलेटचा बार काढून जेजींनी तो तिच्याकडे दिला. "आवडतं ना चॉकलेट..?" वडी पाहताच तिचा चेहरा खुलला होता पण बुजून ती जागच्याजागीच बसून होती. "घे घे ना..!" जेजी म्हणाले. एकदा देशपांड्यांकडे पाहून ती पुढे झाली आणि तिनं चॉकलेटचा बार हातात घेतला. "बस जा खुर्चीवर आणि आताच खाल्ला तरी चालेल." जेजी म्हणाले, "नीट आरामात बस. मी तुला काही काही विचारणार आहे. ठीक आहे..? खाता खाता बोललीस तरी चालेल. तर मग - तुला आठवतं का की तुला डॉक्टरांनी काही दिवस हॉस्पिटलमधे ठेवलं होतं..?"

"हो आठवतं.."

"डॉक्टरांनी काही इंजेक्शन दिली का..?"

"नाही.."

"काही कडू औषधं दिली का..?"

"नाही.."

"मग घरी पाठवून दिलं.."

"हो.."

"छान, आता मी आणखी काही विचारणार आहे - पण अशी आखडून बसू नकोस - आरामात बस. मागे सरक - पाठ मागे टेकव - मान मागे टेकव - हात खुर्चीच्या हातावर ठेव - छान. विचारतो त्याची सरळ उत्तरं द्यायची काय..? छान. आधी एक सांग - तुला कितीपर्यंत आकडे मोजता येतात..?"

"शंभर पर्यंत.."

"छान छान, लाग बरं एकापासून मोजायला..."

पारू घाईघाईने एक दोन तीन चार असे अंक मोजायला लागली.

"थांब थांब इतकी घाई करायची नाही - सावकाश मोजायचे - म्हणजे एक... दोन... तीन... असे - "

"एक... दोन... तीन..."

"पारू, मागे तुकवून आरामात बस ना..! डोळे मिटलेस तरी चालेल - अस्सं -"

जरा वेळाने जेजी म्हणाले - बघ - हात जड होताहेत ना..? झोप आल्यासारखी वाटते ना..? मग झोपलीस तरी चालेल - खुशाल झोप -"

पारूचे शब्द अडखळत यायला लागले. आणि सातपाशी थांबले.

"पारू..!" जेजी पुढे वाकून म्हणाले, "ऐकू येतं का..?"

"हो.."

"समजतं का मी बोलतो आहे ते..?"

"हो.."

"मग आता तू झोपणार आहेस - पण मी पारू, एक दोन तीन म्हणताच तुला जाग येणार आहे. समजलं..? एक दोन तीन म्हणताच..! समजलं..?"

"हो.."

"पारू.." जेजी जरा गंभीर आवाजात म्हणाले, "आता पहा हं - रोज संध्याकाळची तू घरी एकटी असतेस तेव्हा घराच्या दारात बसतेस..?"

"हो,"

"काय करतेस..?"

"चाळीच्या अंगणात मुलं खेळत असतात ते पाहते.."

"पण मुलं नसतील तर..?"

"अंगणात पिंपळाचं मोठं झाड आहे - कधी कधी अगदी वरच्या पानावर ऊन पडलेलं असतं - ती पण कशी चकचक करतात, ते पाहात बसते - "

"तशीच त्या संध्याकाळी बसली होतीस तेव्हा काहीतरी झालं - हो ना..?"

"हो.."

"काय झालं.."

"झाडाच्या फांदीवर हुप्प्या माकडासारखं काहीतरी बसलेलं होतं - मग ते एकदम खाली उतरलं आणि माझ्या जवळून घरात गेलं - मी किती भ्यायले..!"

"मग..?"

पण पारूचं काहीच उत्तर आलं नाही. ती नुसती डोळे मिटून बसून होती.

"पारू..? सांग - मग काय झालं..?" जेजींचा आवाज कठीण झाला होता.

दोन तीन सेकंदातच पारूचे डोळे खाडकन उघडले. डोळे इतके विस्फारलेले होते की त्यांच्यात बुबळेमधे तरंगताना दिसत होती. तिचा चेहराही बदलत होता. कपाळावर आठ्या आल्या होत्या. आणि तोंड हळूहळू उघडले - चेहऱ्यावर लाली आली होती - आणि चेहऱ्यावर जे हास्य होतं ते इतकं विलक्षण होतं की शरीरावर काटाच यावा आणि मग ती बोलली - पण आवाज आला तो नऊ वर्षांच्या मुलीचा नव्हता तर पुरुषी होता. राकट होता, उद्दाम होता.

"तिला कशाला विचारतोस..? ती काही सांगणार नाही, मला विचार की.." आयुष्यात जेजींनी इतका शीघ्र विचार कधी केला नव्हता - एका क्षणात त्यांच्या लक्षात आलं - प्रकरण आपल्या हाताबाहेर जात आहे. आपण काही यातले तज्ज्ञ नाही - हा प्रांत आपला नाही, एखादं प्रवेश बंद दार उघडून आत जावं तसं त्यांना वाटलं. हा अवकाश अपरिचित होता. कदाचित धोक्याचंही असेल - इथे काहीही होऊ शकतं. नाही हे दार तात्काळ बंद करायला हवं..!

एवढ्या विचाराला त्यांना सेकंदभरही अवधी लागला नसेल.

"आता का रे दातखिळी बसली..?" तो भसाडा आवाज लहानशा पारूच्या तोंडून येत होता. "तिला तावातावाने विचारत होतास ना..? मग मी सांगतो. ऐक मी झुंगू आहे. वडपिंपळाच्या झाडावर वस्ती करून असतो - पण कधीकधी असं नवीन झाड मिळतं." स्वतःच्या दोन्ही खांद्यांवर पारुने हात थोपटले. "पाहिलंस ना..? पिंपळाचं नवीन झाड सोडून मी हे नवीन झाड धरलं आहे - तिला जन्मभर सोडणार नाही. आता ती लहान आहे. दोन भाकऱ्यावर मी सध्या भागवतो आहे - पण तिला जरा मोठी होऊ दे - मग पहा कशी -"

इथपर्यंतचा भाग मा. श्री. नारायण धारप यांनी लिहिला होता. कादंबरीचा या पुढील भाग डॉ. अरुण मांडे यांनी पूर्ण केला आहे...

~~~~~~~~~

नवल नाही जेजी थोडेसे घाबरलेच होते. त्यांच्या कपाळावर घाम आला होता. हातांनीच पुसताना ते विचार करत होते. हे लवकरात लवकर थांबायला हवं होतं.

"तू जा आता," ते म्हणाले.

"मी जाईन नाही तर नाही जाणार. माझी मर्जी," झुंगू म्हणाला.

"तू आता जा.." जेजी पुन्हा म्हणाले.

त्यांना आता पारूची काळजी पडली होती. त्यांनी आपल्या जबाबदारीवर तिला इथं आणलं होतं. तिला संमोहनावस्थेत त्यांनी नेलं होतं खरं, पण आता जर ती पूर्वपदावर आली नाही तर..?

"झुंगू.." त्यांनी हाक मारली.

पारूकडून उत्तर आलं नाही.

"झुंगू.." त्यांनी पुन्हा हाक मारली.

पारू गप्पच होती. तिनं डोळे मिटून घेतले होते.

"एक दोन तीन.." जेजी म्हणाले, त्यांच्या आवाजात निकड होती. अधिरपणा होता. अस्वस्थपणा होता. ते एकटक पारूकडे बघत होते.

आणि पारुने खाडकन डोळे उघडले. आणि ती म्हणाली, "अठ्ठयाणव नव्याणव शंभर..." "शाब्बास.." जेजी म्हणाले. त्यांनी समाधानाचा एक सुस्कारा टाकला.

पारुने हातातल्या चॉकलेटकडे एकदा बघितलं आणि विचारलं, "मी खाऊ का..?"

"खा, खा नं..!" जेजी म्हणाले.

पारुने शांतपणे चघळत चघळत चॉकलेट संपवलं. तिला आणखी एक हवं होतं. पण पुन्हा मिळेल अशी शक्यता वाटेना. म्हणून तिनं विचारलं, "मी आता जाऊ..?"

"जा, जा नं..."

देशपांडे हा सगळा प्रकार बघत होते. त्यांनी लगेच रखमाला बोलावलं आणि पारूला न्यायला सांगितलं.

त्या दोघी आत गेल्यावर देशपांडे म्हणाले, "जेजी.."

"देशपांडे काही बोलू नका. जे झालं ते तुमच्यासमोरच झालंय. या पारूनं मला कोड्यात टाकलंय. तिला मी संमोहनावस्थेत नेण्याचा हेतू वेगळा होता. तिला सारखं सारखं खाण्याची जी सवय लागलीय ना -"

"रखमा त्याला भस्म्या रोग म्हणते..." देशपांडे म्हणाले.

"भस्म्या, चांगला शब्द आहे आणि अगदी योग्य आहे. पण तो रोग आहे की नाही माहीत नाही आणि असला तर त्याचं कारण शोधणं आवश्यक आहे. डॉक्टरांनी तर आधीच सांगितलंय त्यांना याचं कारण काही सापडत नाही म्हणून. हे असे रोग बहुधा मानसिक असतात. अनोरेक्झिआ नव्र्होझा नावाचा एक मानसिक रोग आहे. तरुणींमधे या रोगाचं प्रमाण जास्त आहे. अतिशय नैराश्य आलेल्या व्यक्तीला हा रोग होतो. तिची अन्नावरची वासना उडते. कित्येक दिवस ती अन्नपाणी वर्ज्य करते. आणि वेळीच इलाज केला नाही तर ती अक्षरशः खंगून खंगून मरते. देशपांडे, लठ्ठपणा हासुद्धा एक मानसिक रोग आहे. मनामधे असुरक्षिततेची भावना असलेल्या व्यक्तीला हा रोग होतो. अडीअडचणीला कामाला येईल म्हणून आपण जसा पैसा जमवून ठेवतो, तसं ही व्यक्ती चरबी साठवून ठेवते. पण देशपांडे, या पारूनं मला चांगलंच गोंधळात टाकलंय. या सात आठ वर्षांच्या पोरीला असुरक्षितता कशाची वाटत असेल बरे..? आणि तसं म्हणावं तर तिचं वजनही वाढत नाही. इतकं खाऊनसुद्धा ती आहे तशीच आहे. तिचं मानसिक कारण काहीतरी वेगळंच असावं आणि ते शोधून काढण्यासाठी म्हणूनच मी तिला संमोहनावस्थेत नेण्याचं ठरवलं होतं. पण जे झालं घडलं ते भलतंच. अगदीच विलक्षण, अनपेक्षित, अविश्वसनीय. अंगात आलेल्या बायका पुरुषी आवाजात परक्या बाषेत बोलतात, काही तर अस्खलित इंग्रजीत बोलतात हे मला माहीत आहे. पारूच्या तर अंगातही आलं नव्हतं. तिला मी संमोहनावस्थेत नेलं होतं. आणि तरीही -"

"ती नाटक तर करत नसेल ना..?" देशपांडे म्हणाले.

"नाही देशपांडे, तिला नाटक करण्याचं कारणच काय..? घरामधे दुर्लक्षित व्यक्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अंगात येण्याचं नाटक करतात. त्याला मॅलिंगरिंग म्हणतात. पारूला तशी गरजच नाही. रखमाला तिची काळजी आहे हे आपण पाहतोच आहोत की. आणखी बरीच कारणे आहेत. हिस्टेरिया, मॅनिया. पण यातलं कोणतंच कारण पारूला लागू पडत नाही. अंगात आलेली व्यक्ती निरर्थक बडबड करते, तिला ग्रासोलोलिया म्हणतात. पण पारूचं बोलणं निरर्थक वाटत नव्हतं. खरं होतं, नाही देशपांडे, ते नाटक नव्हतं. तो झुंगू अगदी खरा वाटत होता."

"म्हणजे तिला भुतानं पछाडलंय असं म्हणायचं आहे का तुम्हाला..?"

"मी काही यातला तज्ज्ञ नाही. पण याविषयात रस नक्कीच आहे. कोणत्याही अपारंपरिक घटनांचा अभ्यास करणे, त्यांच्या नोंदी ठेवणे हाच तर माझा छंद आहे."

"पण आता या पारूचं काय करायचं..?" देशपांड्यांनी विचारलं.

"तिला एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जायला हवं. तिला लागणार खर्च हवं तर मी करीन. पण देशपांडे, पारूचा मला पुन्हा एकदा अभ्यास करायला हवा. मला जर गरज पडली तर तिला पुन्हा आणता येईल..?" जेजी म्हणाले,

"हो.. हो.. त्यात काही अवघड नाही. रखमा माझ्याकडेच काम करते.. तुम्ही केव्हाही सांगा.."

~~~~~~~~~

क्रमशः...

(तळटीप: - ग्रुपवरील अ‍ॅडमीनच्या पूर्वपरवानगी शिवाय ही कथा इतर कुठेही पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे.)

भाग ०४                                                        भाग ०६

0 comments:

Post a Comment