Disclaimer     
            Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~

Friday, 9 February 2018

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ भाग ०६

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~
मूळ लेखक - नारायण धारप आणि डॉ. अरुण मांडे

भाग ०६


तो विषय तिथंच संपला होता. टिपणवही बघत असताना पारूचा सगळा प्रसंग त्यांच्या डोळयासमोर उभा राहिला होता.

पारू धोंडिबा म्हातरे
अनंत सीताराम जोशी

सरदार रावते यांच्या वाड्यात पुन्हा जायची संधी मिळाली तर या दोघांना सोबत घेऊन जायचं त्यांनी नक्की केलं. तसं झालं तर दोन गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता होती. सरदार रावते यांच्या वाड्याचं गूढ उकललं असतं, आणि त्यांची उपपत्ती खरी आहे की नाही हे पण सिद्ध झालं असतं.

जेजींनी आपल्या टिपणवहीत तशी नोंद केली.

आता वाट पाहात राहणं एवढंच त्यांच्या हातात होतं.

~~~~~~~~~

पण त्यांना फार वाट बघावी लागली नाही. दुसऱ्याच दिवशी त्यांना संभाजीरावांचा फोन आला.

"जेजी, ताबडतोब माझ्याकडे या.." ते म्हणाले.

"काय विशेष..?"

"आल्यावर सांगतो..," असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला.

जेजींना अतिशय नवल वाटलं. ताबडतोब निघण्यासारखं असं काय तातडीचं काम निघालं असेल बरं..?

फोन खाली ठेवून ते निघालेच.

बंगल्याच्या मोठ्या दाराची घंटी वाजवताच दार उघडलं. पण दारात गडी नव्हता, प्रत्यक्ष संभाजीरावाच दारात उभे होते.

"या या, मी तुमचीच वाट पाहात होतो. आपण इथंच बसू.."

बाहेरच्या हॉलमध्ये सोफासेट होता. संभाजीराव सोफ्यावर बसले. जेजी त्यांच्यासमोरच्या सोफ्यावर बसले.

तेवढ्यात गडयांनं चहा आणून दिला.

चहा घेईपर्यंत संभाजीराव काही बोलले नाहीत. त्यांचा चेहरा विचारमग्न होता. चिंतामग्न होता.

गडयांनं चहाचे कप आतमधे नेत असतानाच बाहेर हॉर्नचा आवाज ऐकू आला. संभाजीराव लगेच उठले आणि म्हणाले, "जेजी, आपल्याला माहूलगावी जायचंय. आमच्या वाड्यावर."

"आत्ता..?" जेजींना अतिशय आश्चर्य वाटलं.

"हो.."

"काही विशेष घडलंय का..?"

"हो, काय ते वाटेत सांगतो.." मग अचानक थांबून त्यांनी भानावर येऊन विचारलं, "पण जेजी, तुम्हाला वेळ आहे ना..? हे मी तुम्हाला आधीच विचारायला हवं होतं."

"हो भरपूर आहे. काही काळजी करू नका." असं म्हणून जेजीपण उठले. दोघंही बाहेर आले.

फाटकपाशी निळ्या रंगाची एक जुनी ऑस्टिन उभी होती. पन्नासचं मॉडेल असावं. पण तिच्या चमकदार रंगावरून तिची देखभाल चांगली होत असावी असा अंदाज करता येत होता.

आम्हाला बघताच कारचं दार उघडून एक इसम बाहेर आला. तपकिरी रंगाचा सफारी घातलेला तो माणूस ड्रायव्हर असावा. त्यानं संभाजीरावांना सलाम केला.

"रसूल आता घरी जा. आज कार मी चालवणार आहे." संभाजीराव म्हणाले.

"ठीक आहे साहेब.." असं म्हणून तो निघून गेला. "बसा.." संभाजीरावांनी जेजींसाठी पुढच्या सीटचं दार उघडलं होतं. ते आत बसल्यावर संभाजीराव कारला वळसा घालून ड्रायव्हरसीटचं दार उघडून आत बसले. आणि त्यांनी कार चालू केली.

संभाजीराव सफाईने कार चालवत होते. रस्त्यावरचे सायकलींचे, मोटारसायकलींचे अडथळे, चौकाचौकातले सिग्नल, रस्ता ओलांडणारे पादचारी, बसेस आणि रिक्षा यांच्या भूलभुलैयातून सुखरूपपणे बाहेर निघून पुण्याबाहेर पडायलाच आम्हाला एक तास लागला. एक लहानसा घाट चढल्यावर त्यांना बोलायला फुरसत मिळाली.

"गणपत मिस्त्रीचा सकाळी फोन आला होता. वाड्यावर गडबड झालीय म्हणत होता."

संभाजीरावांनी जेजींना सांगायला सुरुवात केली.

"गडबड म्हणजे..?" जेजींनी विचारलं.

"चोरी झालीय.." एवढंच सांगून ते गप्प बसले.

"वाड्यात चोरी होण्यासारखं काही होतं का..?" जेजींनी विचारलं.

"काहीही नाही. सगळा वाडा रिकामा आहे. वाड्यात कुणी नसतं असं बघून चोर आत घुसले असणं शक्य आहे. पण त्यांना काहीही मिळालं नसणार." संभाजीराव म्हणाले.

"पण चोरी झाली हे मिस्त्रीला कसं समजलं..?" जेजींनी विचारलं.

"ते काही त्यानं सांगितलं नाही. फोनवर मला सांगताना तो खूप घाबरला होता. मी त्याला वाड्यावर बोलावलंय. आता भेटला म्हणजे आपल्याला सविस्तर विचारता येईल."

त्यानंतर संभाजीरावांनी आपलं सगळं लक्ष गाडी चालवण्याकडे लावलं. त्यांचा चेहरा विचारमग्न दिसत होता. जेजींनी मग त्यांना काही विचारलं नाही. वाड्यावर इतक्या लवकर जायला मिळेल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. हे अगदीच अनपेक्षित घडलं होतं. त्यामुळे त्यांनी काही तयारीपण केली नव्हती. म्हणजे मानसिक तयारी. पण अशा अवचित प्रसंगातूनच विलक्षण अनुभव येतात. याची त्यांना कल्पना होती.

पस्तीस मैलाचं अंतर कापायला त्यांना एक तास लागला. माहूलगावाच्या बाहेरून ते खडीच्या रस्त्याला लागले. आणि दुरूनच जेजींना गणपत मिस्त्रीची मोटारसायकल दिसली. आणि मग एका दगडावर विडी पित बसलेला मिस्त्रीपण दिसला.

धूळ उडवत येणारी गाडी बघताच विडी पायाखाली दाबून तो घाईघाईनं उठला. तोपर्यंत गाडी त्याच्याजवळ येऊन थांबली होती.

संभाजीराव आणि जेजी खाली उतरले. मिस्त्रीनं संभाजीरावांना नमस्कार केला. खिशातून किल्ल्या काढण्यासाठी हात घातला. आणि तो वाड्याकडे जायला वळला.

"गणपत जरा थांब." संभाजीराव म्हणाले.

तो थांबला आणि मान वळवून त्यांच्याकडे बघू लागला.

"आधी काय झालंय ते मला सांग." ते म्हणाले.

"मालक, त्याचं काय झालं, तो धनगराचा पोरगा नाय का रामू, तो शेळ्या चारायला इथे आला होता, सकाळी. त्याला वाड्यातून काहीकाही आवाज ऐकाय आले."

"कसले आवाज..?"

"तो खूप घाबरला होता मालक, धड सांगत नव्हता. दारं खिडक्या आपटण्याचे आवाज म्हणत होता, वावटळ घुसली म्हणत होता, तोफा बंदुकाचा बार म्हणत होता, त्याचं बोलणं त्यालाच कळत नव्हतं बघा." गणपत म्हणाला.

"मग तू काय केलंस."

"काही नाही. तुम्हाला एसटीडीवरनं फोन केला."

"तू वाड्यात जाऊन बघितलं नाहीस..?"

"नाही बा. मी पण घाबरलो मालक, इकडं यायचीच भीती वाटली. मग तुम्हाला फोन केला."

"बरं चल, कुलूप उघड." संभाजीराव म्हणाले.

जेजी गाडीजवळ उभे राहून वाड्याकडे बघत होते.

आणि बघता बघता ते घडलं.

एक क्षणभरच, क्षणभरच मळभ आल्यासारखं अंधारून आलं. समोरच्या वाड्यावर ढगांची सावली पडली. हलणाऱ्या पाण्यावरच्या प्रतिबिंबासारखा वाडा हलला. हिंदकळल्यासारखा.

आणि पुन्हा सगळं पूर्ववत झालं. संध्याकाळच्या उतरत्या उन्हात वाडा उजळून निघालेला दिसत होता.

मग आपण पाहिलं ते काय होतं..? तो भास होता..? दृष्टीभ्रम..? की आणखी काही..? एखादा संकेत..? धोक्याची सूचना..?

वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची शरीराला जाणीव करून देतं. स्नायू ताठ होतात. अंगावर शहारा येतो. हृदयाची धडधड वाढते. डोळ्यासमोर अंधारी येते. आक्रमण किंवा प्रतिक्रमण, संघर्ष किंवा पलायन याची ती पूर्वतयारी असते. एका क्षणात निर्णय घ्यायचा असतो.

जेजींना हा अनुभव नवीन होता. आणि म्हणूनच त्यांना निर्णय घेता येत नव्हता. त्यांना पुढं जाता येत नव्हतं, आणि मागेही जाता येत नव्हतं. पुतळ्यासारखे ते स्तब्ध उभे राहिले होते.

"जेजी.."

संभाजीरावांच्या हाकेने ते भानावर आले.

"अं..!"

"येताय नं..?"

मन अजूनही धोक्याची सूचना देत होतं. आता मात्र त्यांनी निर्णय घेतला. तो सावधगिरीचा होता. थोडासा पलायनाचाच होता. किंवा सावरण्यासाठी त्यांना वेळ हवा होता काहीही म्हणा. ते म्हणाले.

"संभाजीराव, दाराला कुलूप आहे, म्हणजे जे कोणी आत शिरले असतील ते वेगळ्या मार्गानं आत गेले असणार. आपण आधी वाड्याला बाहेरून चक्कर मारली तर..?" संभाजीरावांनी थोडासा विचार केला, मग म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे." मग ते गणपतकडे वळून म्हणाले, "तू वाड्यात जा. आम्ही आलोच."

मग ते दोघं वाड्याच्या डाव्याबाजूनं जाऊ लागले.

वाड्याभोवती सगळं तण माजलं होतं. उन्हाळा अजून सुरु झाला नव्हता. पण गवतावर पिवळी छटा दिसू लागली होती. काही हिवराची आणि बाभळीची खुरटी झाडं इतस्ततः पसरली होती. बाकी सगळं माळरानाच होतं.

पायवाट नव्हतीच. तिथं कुणाचा वावरच नव्हता. असायचं काही कारणच नव्हतं. गवत तुडवत ते दोघं चालत होते.

वाड्याला चारही बाजूनं भक्कम तट होता. जमिनीपासूनच अनगढ दगडी तट अजूनही टिकून होता. पण त्यावरचं विटांचं बांधकाम मात्र चांगलंच ढासळलं होतं. काही ठिकाणी तर त्याला खिंडारं पडली होती. आणि त्यातून आतला तीन माजली वाडा उघडा पडला होता. चार फुटांचा दगडी तट चढून गेलं तर वाड्यात कुणालाही सहज प्रवेश करता आला असता. पण ते जरा अशक्यच होतं. कारण चढण्यासाठी तटाजवळ एकही उंच झाड नव्हतं. एखाद्यानं अगदी दोर वापरून चढायचं ठरवलं तर गोष्ट वेगळी.

वाड्याभोवती फिरताना संभाजीराव आणि जेजी खाली बघत चालले होते. त्यांना कुठंही माणसाचा हस्तक्षेप झाल्याच्या खुणा दिसत नव्हत्या. माहूलगावच्या परिसरात वाड्याविषयीचा प्रवाद सगळ्यांनाच माहीत होता. चोरांनी इतक्या वर्षात आत प्रवेश करण्याचे प्रयत्न केलेच असणार आणि त्यांना काही अनुभव आलेच असणार. असं असूनही वाड्यात शिरण्याची ही घटना घडली होती. याचा अर्थ तो नवखा होता. असे अनुनभवी चोर काहीतरी मागे पुरावा ठेवून जातात. विडीची थोटकं, गावठी मद्याची एखादी बाटली. पावलांचे ठसे, सायकलीच्या टायरचे ठसे.

पण दोघांना तर तसं काहीच दिसलं नाही. आणि तरीसुद्धा वाड्यात कुणीतरी शिरलं होतं हे नक्की.

जेजीच्या मनात एक शंका आली. खरंच कोणी बाहेरून आत शिरलं असेल का..? आतच कुणाचं तरी कायमचं वास्तव्य असलं तर..?

कदाचित हाच विचार संभाजीरावांच्या मनात आला असावा. कारण दोघांनी एकाचवेळेस वाड्याकडे बघितले. ते आता वाड्याच्या मागच्या बाजूला होते. तिथून त्यांना वाड्याचे वरचे दोन मजले स्पष्टपणे दिसत होते. दुसऱ्या मजल्याला तीन आणि तिसऱ्या मजल्याला दोन खिडक्या होत्या.

त्या सताड उघड्या होत्या.

जेजी गणपतबरोबर वाडा बघायला आले होते तेव्हा सगळ्या खिडक्या बंद होत्या हे त्यांना चांगलं आठवतं होतं.

याचाच अर्थ आतमधे कुणीतरी होतं. ते दोघं वाड्याकडे बघत होते. आणि एखाद्या अजस्त्र कोळ्यासारखा तो वाडा आपल्या पाच डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत होता.

तिसऱ्या मजल्यावरच्या डाव्याबाजूला खिडकीत एखादी सावली हलल्यासारखी झाली.

आत कोणीतरी वावरत होतं.

मग तीच सावली बाजूच्या खिडकीत हलल्यासारखी झाली.

तीच होती की शेजारच्या खोलीत आणखी कुणीतरी होतं..?

म्हणजे आत आहेत तरी किती जण..?

संभाजीराव आणि जेजी मान वर करून बघत असतानाच अचानक डाव्या खिडकीमधे एक चेहरा दिसला.

दोघंही दचकून मागे सरकले.

तो चेहरा सेकंदाच्या काही भागापुरताच दिसला आणि लगेच उजव्या बाजूच्या खिडकीत दिसला आणि क्षणात नाहीसा झाला.

तो चेहरा होता, पण त्यावरचा तपशील दोघांनाही सांगता आला नसता. कोणीतरी बाहेर डोकावून बघत होतं एवढं निश्चित.

संभाजीरावांनी विस्फारलेल्या डोळ्यांनी जेजींकडे मान वळवून बघितलं.

जेजीपण त्यांच्याकडेच बघत होते.

"मला जे दिसलं ते तुम्हालाही दिसलं..?" संभाजीरावांनी विचारलं.

जेजींनी होकारार्थी मान हलवली.

तेवढ्यात त्यांना मोटारसायकलचा आवाज आला. तो वेगानं दूर जात होता. दोघंही चालू लागले. त्यांनी आपला वेग वाढवला. त्यांच्या वयाच्या मनानं पळता येईल तेवढं ते पळू लागले.

वाड्याला वळसा घालून ते पुन्हा दिंडीदरवाज्यापाशी आले, तेव्हा दोघांनाही चांगलीच धाप लागली होती. छाती चांगलीच धडधडत होती. त्याचं शारीरिक कारणही होतं आणि मानसिक कारणही होतं.

गणपतची मोटारसायकल दिसत नव्हती.

आणि दाराला भलंमोठं कुलूप होतं.

हा वाडा बंद करून गेला कुठं..?

धाप कमी होण्यासाठी ते जवळच्याच एका लांबलचक शिळेवर बसले. गुडघ्यावर हाताची कोपरं ठेवून, मान खाली घालून ते मन स्थिरस्थावर होण्याची वाट पाहू लागले. दोघंही कदाचित एकच विचार करत असावेत.

गणपत दार उघडून आत गेला होता. आधी पहिल्या मग दुसऱ्या आणि मग तिसऱ्या मजल्यावर गेला असेल. त्याला कुणाची तरी चाहूल लागली असेल. घाबरून तो खाली आला असेल. संभाजीरावांचा, जेजींचा किंवा आणखी कोणाचाही विचार न करता त्यानं मोटारसायकल चालू करून इथून पळ काढला असावा.

किंवा अशीही एक शक्यता होती. आत जे कोणी असतील त्यांना बाहेर जाण्याची एक वाट बंद करून, म्हणजे दाराला कुलूप लावून, तो पोलिसांना कळवण्यासाठी गावात गेला असावा.

दुसरी शक्यता जास्त शक्यकोटीतली वाटत होती. गणपत घाबरून जाणाऱ्यांपैकी नव्हता. वाड्यातला तो अनुभव त्यानं अगदी तटस्थपणे सांगितल्याचं जेजींना आठवलं. शिवाय संभाजीरावांनी पारख करूनच त्याला कामाला ठेवलं असणार.

छे..! गणपत पळून जाणाऱ्यापैकी नक्कीच नाही.

संभाजीराव शिळेवरून उठले. त्यांनी कारचं दार उघडलं. आतून पाण्याची एक बाटली काढली. हाताची मूठ तोंडाजवळ धरून, मान मागे करून त्यांनी दोन घोट घेतले आणि बाटली जेजींकडे दिली.

जेजींनाही चांगलीच तहान लागली होती.

दोन घोट घेऊन बाटली पुन्हा संभाजीरावांकडे देत असतानाच दोघांनाही मोटारसायकलचा आवाज ऐकू आला.

दोघांनीही त्या दिशेने बघितले.

आधी धूळ दिसली, मग मोटारसायकलवरचा गणपत.

एक दोन मिनिटातच तो जवळ आला. गाडी स्टँडवर लावत असतानाच संभाजीरावांनी त्याला विचारलं, "कुठं गेला होतास..?"

ओशाळलेल्या स्वरात गणपत म्हणाला, "किल्ल्या आणायला.."

"म्हणजे..?"

"म्हणजे असं झालं मालक, गडबडीमधी चुकून मी दुसऱ्याच किल्ल्या खिशात घातल्या आन इथं आलो बघा. कुलूप उघडताना ध्यानात आलं. इचार केला, तुमी येईपर्यंत गाडीवर जाऊन किल्ल्या आणाव्या म्हणून गेलो होतो साहेब.."

त्याचे शब्द अगदी साधे होते. पण त्याचा परिणाम किती जबरदस्त होता.

गणपतनं वाडा उघडलाच नव्हता तर मग वाड्यात कोण होतं..? किडकीमधे जे दिसलं ते काय होतं..?

"ठीक आहे, आता लवकर उघड, आधीच उशीर झालाय.." संभाजीराव घोगऱ्या आवाजात म्हणाले.

गणपतने किल्ल्यांचा जुडगा काढला आणि दिंडी दरवाजाचं कुलूप उघडलं. दिंडीला हात लावताच ती आत गेली. गणपत, संभाजीराव आणि मग जेजी असे त्यातून आत गेले.

काही पावलं चालत फरसबंद अंगणात आले. वाड्याच्या मुख्य दाराच्या दिंडीलाही कुलूप तसंच होतं. गणपत ते उघडत असताना संभाजीराव आणि जेजी अस्वस्थपणे उभं राहून वाड्याचा कानोसा घेत होते. समोरचा तीन माजली वाडा शांत होता. स्मशानशांतता एक नेहमीची उपमा जेजींच्या मनात आली. पण ती स्मशान शांतता नव्हती. किंवा ती वादळापूर्वीची शांतताही नव्हती. मनावर दडपण येत होतं. विचारांची साखळी सारखी तुटत होती. कानांना डोळ्यांना जे प्रतीत होत होतं ते मेंदूपर्यंत जात नव्हतं, किंवा तो ग्रहण करत नव्हता.

गणपत पाठोपाठ दोघंही वाड्यात शिरले. दोन्ही बाजूच्या देवड्यामधला बोळ पार करून ते पुन्हा एका फरसबंद चौकात आले. दोन्ही बाजूंनी वर जायला जिने होते.

"मालक ते बघा.." गणपत म्हणाला.

दोघांनी त्याच्या हाताच्या बोटाच्या दिशेने वर बघितले.

दोन्ही मजल्याची सगळी दारं आणि खिडक्या सताड उघडी होती.

"गणपत, तुला मी नेहमी सांगत असतो, वाड्यातली सगळी दार बंद करत जा म्हणून. प्रत्येक दाराला कुलूप लावायला हवं."

"मालक, खंडोबाची आण घेऊन सांगतो, माजी कायबी चुकी नाही. मी सगळी दारं माझ्या हातांनी लावली होती. कुलूपं बी लावली होती. हवं तर या साहेबांना विचारा. तेच सोबत होते माझ्या." गणपत गयावया करून सांगत होता. थोडासा घाबरलाही होता. जेजी लगेच त्याची बाजू घेत म्हणाले, "संभाजीराव, तो म्हणतो ते खरं आहे. माझ्यासमोर त्यानं सगळ्या दारांना कुलूपं लावली होती आणि खिडक्याही बंद केल्या होत्या."

संभाजीरावांनी क्षणभर पुन्हा एकदा वर बघितलं आणि मग ते म्हणाले, "चला आपण वर जाऊ."

डाव्या बाजूच्या जिन्याची पहिली पायरी चढताना संभाजीरावांनी सहज उजव्या हातानं जिन्याच्या कठड्याचा आधार घेतला. आणि त्यांचा तोल गेला.

जेजींनी त्यांना सावरलं. पण तो कठडा मात्र संपूर्णपणे बाहेरच्या बाजूनं कलला आणि मोडून खाली पडला.

पण आता संभाजीराव थांबायला तयार नव्हते. ते पायऱ्या चढून वर गेले. त्यांच्या पाठोपाठ जेजी आणि गणपत.

पहिल्या मजल्यावरच्या प्रत्येक खोलीसमोर उभे राहून ते आत डोकावून बघत होते. कोणत्याही खोल्यांमधे कोणतेही सामान नव्हतेच. त्यामुळे ते चोरीला जाण्याची शक्यता नव्हतीच. पण खोल्या बघताना एक गोष्ट लक्षात येत होती. खोल्यांची दारं आतल्या बाजूला उघडली होती. खिडक्यांची दारं बाहेरच्या बाजूनं. एखाद्या वादळानं आत शिरून सगळी दार खिडक्या आपटून दाणादाण उडवल्यासारखं दिसत होतं.

पण वादळ आत शिरेलच कसं..? तसं असतं तर खिडक्यांची दारं मोडून आत पडली असती. इथं काही दारं आतल्या बाजूला आणि खिडक्या बाहेरच्या बाजूला मोडून पडल्या होत्या. नुसतं एवढंच नाही. कपाटाची दारं आत वाकली होती. नुसतं एवढंच नव्हतं.

खोलीमधल्या घडवंच्या, आसनं मेज सगळं कुणीतरी एकत्र करून किंवा सरकवून खोलीच्या मध्यावर आणून ठेवली होती. आणि पिरॅमिडसारखी रचून ठेवली होती. ते तिघे तिसऱ्या मजल्यावर गेले. तिथंही हीच परिस्थिती होती.

एकेक खोली ओलांडत ते त्या खोलीजवळ आले.

खोलीत शिरण्यापूर्वी तिघंही थबकले.

तिघांनाही या खोलीत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा अनुभव आला होता.

जेजींना या खोलीच्या समोर येताच पायाखाली एकदम खोल काळी गर्ता उघडावी तसं वाटलं होतं. किंवा पाण्याचा एखादा प्रचंड लोट अंगावर येत असल्याची भावना.

गणपतला या तिसऱ्या मजल्यावर खाली यायची वाटच सापडत नव्हती. आणि रावते यांना याच खोलीत छताच्या कडीला दोरीनं टांगलेलं प्रेत दिसलं होतं, आणि ते त्यांच्याकडे मान वाळवून हसत होतं.

तिघांचे अनुभव वेगळे, पण परिणाम एकच.

या वास्तूमधे विचारांना दृश्यस्वरूप देण्याचा एक विलक्षण गुण होता यात काहीच शंका नाही. जेजी विचार करत होते. त्यांच्या मनात हळूहळू एक योजना तयार होत होती.

संभाजीरावांनी कसलाही विचार न करता त्या खोलीत पाऊल टाकलं. पाठोपाठ जेजी आणि मिस्त्री.

आणि तिघंही दारापाशीच थांबले. त्यांना खोलीत एक विलक्षण दृश्य दिसलं.

खोलीतलं सगळं सामान कुणीतरी मध्यावर आणून ठेवलं होतं. सागवानी खुर्च्या, मेज टेबल, उंच स्टूल, चौरंग, एका मोठ्या पलंगावर पिरॅमिडसारखं मांडून ठेवलं होतं. आणि त्यावर चित्रांच्या सोनेरी चौकटी.

संभाजीराव त्या पिरॅमिडजवळ गेले. त्यावरची सगळ्यात वरची चौकट त्यांनी दोन्ही हातांनी उचलली. उलट होती ती सुलट केली.

तो पर्यंत जेजी त्यांच्याजवळ आले होते. त्या चौकटीमधे एक पोर्ट्रेट होतं. कुणा पेशवाईतल्या सरदाराचं फिकट निळ्या रंगाचा किनखापी अंगरखा. गळ्यामधे मोत्याची बोरमाळ. कानामधे सोन्याचे कुंडल. आणि डोक्यावर जरीपटका.

आणि तो चेहरा भव्य कपाळ, धारदार नाक, जाड ओठ, आणि डोळे. ते तर किती विलक्षण. त्यामधे एक पाशवी दहशत होती, वासना, लालसा, छद्मीपणा, उद्धटपणा, मग्रुरी या सगळ्यांचं मिश्रण त्यामधे होतं.

ज्या कुणा चित्रकारानं ते पोर्ट्रेट चितारलं होतं तो अगदी नवखा होता. रंगरेषा सफाईच्या नव्हत्या. कदाचित चेहरासुद्धा जसाच्या तसा चितारता आला नसेल त्याला. परंतु त्याचं सगळं कसब त्या डोळ्यात होतं. सगळं कौशल्य वापरून त्यानं ते डोळे रंगवले होते. ते इतके परिणामकारक होते कि दोनशे अडीचशे वर्षांच्या कालावधीनंतरही त्यातला जिवंतपणा अजूनही तसाच होता. पोर्ट्रेट बघणारा नजरेला नजर देऊ शकत नव्हता.

दोन्ही हातात चित्राची चौकट धरून संभाजीराव एकटक त्या चित्राकडे बघत होते. मग ते म्हणाले, "जेजी हाच तो चेहरा. याच खोलीत मला दोरीला लटकलेलं प्रेत दिसलं होतं ना, त्याचा चेहरा अगदी असाच होता."

क्रमशः...

(तळटीप: - ग्रुपवरील अ‍ॅडमीनच्या पूर्वपरवानगी शिवाय ही कथा इतर कुठेही पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे.)

भाग ०५                                                           भाग ०७

0 comments:

Post a Comment